अडीच वर्षांपासून फरार खूनप्रकरणातील आरोपी जेरबंद; विष्णुनगर पोलिसांची नांदेडमध्ये कारवाई
पोलीस महानगर नेटवर्क
डोंबिवली : डोंबिवली पश्चिम येथील खाडीकाठावर २०२३ मध्ये घडलेल्या खूनप्रकरणातील अडीच वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला विष्णुनगर पोलिसांनी नांदेड जिल्ह्यातून शिताफीने अटक केली. दिपक साहेबराव करकडे (वय २८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो मूळचा परभणी जिल्ह्यातील पेगर गव्हाण येथील रहिवासी आहे.
२७ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी सुमारे १०.४३ वाजता विष्णुनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत देविचापाडा, स्मशानभूमीच्या मागे, महेश्वरी मठासमोरील खाडीकाठावर ४० ते ४५ वर्षे वयोगटातील एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. मृताच्या डोक्यावर, कपाळावर आणि तोंडावर गंभीर जखमा होत्या. या प्रकरणी पोलीस पाटील लक्ष्मीकांत भोईर यांच्या तक्रारीवरून विष्णुनगर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करून तसेच स्थानिक माहितीच्या आधारे मृताची ओळख सोमनाथ बाबू शिंदे अशी पटवली. पुढील चौकशीत विलन विष्णू ठावरे (वय ४१) आणि योगेश तिमाप्पा डोंगरे (वय ४२) यांना अटक करण्यात आली होती. त्यांनी त्यांचा साथीदार दिपक करकडे याच्यासह किरकोळ कारणावरून सोमनाथ शिंदे यांच्यावर दगडाने हल्ला करून त्यांचा खून केल्याची कबुली दिली होती.
या दोघांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. मात्र, दिपक करकडे हा गुन्ह्यानंतर अटकेच्या भीतीने फरार झाला होता. तो वारंवार वास्तव्याची ठिकाणे बदलत असल्याने पोलिसांना त्याचा माग काढणे कठीण जात होते.
विष्णुनगर पोलीस ठाण्याचे पथक गेली अडीच वर्षे त्याच्या शोधात होते. अखेर तांत्रिक विश्लेषण, मोबाईल क्रमांकांची पडताळणी आणि बातमीदारांच्या मदतीने आरोपी नांदेड जिल्ह्यातील वाटेगाव परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे आणि पथकाने २४ एप्रिल २०२६ रोजी वेशांतर करून सापळा रचला आणि आरोपीला ताब्यात घेत अटक केली.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त संजय जाधव, पोलीस उपआयुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम चोपडे, पोलीस निरीक्षक जी. एस. गमे आणि त्यांच्या पथकाने केली.