बीडमध्ये पत्नी नांदायला न आल्याने जावयाने सासऱ्याचे घर पेटवले; अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांत गुन्हा
पोलीस महानगर नेटवर्क
बीड : पत्नी नांदायला येण्यास नकार दिल्याच्या रागातून दारूच्या नशेत पतीने सासऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून आग लावल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील पिंपळा धायगुडा येथे घडली. या घटनेत घरातील गृहपयोगी साहित्य जळून खाक झाले असून शेजाऱ्यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला मागील आठ दिवसांपासून पतीच्या दारूच्या सवयीला कंटाळून माहेरी राहत होती. दरम्यान पती राहुल दत्तोपंत जगताप हा सासरवाडीत येऊन पत्नीला परत नांदायला येण्याची मागणी करत होता. मात्र पत्नीने ‘दारू पिणे बंद केल्याशिवाय मी येणार नाही,’ असे स्पष्ट सांगितल्याने त्यांच्यात वाद झाला.
या वादातून संतप्त झालेल्या राहुल जगताप याने सोबत आणलेल्या कॅनमधील पेट्रोल घराच्या दरवाजावर आणि खिडकीतून आत ओतून आग लावल्याचा आरोप आहे. काही वेळातच घरातील साहित्याला आग लागली. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेत आग आटोक्यात आणली.
या प्रकरणी सुलोचना राहुल जगताप यांच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाणे येथे राहुल दत्तोपंत जगताप याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.