लातूरमध्ये गोवा बनावटीच्या मद्याची तस्करी उघड; उत्पादन शुल्क विभागाकडून सुमारे १५ लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलीस महानगर नेटवर्क
लातूर : राज्यात अवैध मद्यविक्री व वाहतुकीविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत राज्य उत्पादन शुल्क विभागाने लातूर जिल्ह्यात मोठी कारवाई केली. दोन वेगवेगळ्या कारवायांत गोवा बनावटीच्या विदेशी मद्यासह सुमारे १४ लाख ५८ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने केली. राजेश देशमुख (राज्य उत्पादन शुल्क आयुक्त), प्रसाद सुर्वे (सहआयुक्त) आणि बी. एच. तडवी (विभागीय उपायुक्त) यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
पहिल्या कारवाईत चांडेश्वर पाटी, लातूर येथे लातूर–औसा रोडवर सापळा रचण्यात आला. संशयित इनोव्हा कारची झडती घेतली असता गोवा बनावटीच्या १८० मि.ली. क्षमतेच्या २ हजार ६४ सीलबंद बाटल्या आढळून आल्या. मद्यसाठा आणि वाहतुकीसाठी वापरलेले वाहन असा एकूण ११ लाख ४ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
दुसऱ्या कारवाईत येरोळ मोड – उजळंब मार्ग येथे छापा टाकण्यात आला. इनोव्हा वाहनातून गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने कारवाई केली. वाहनाची तपासणी करताना १८० मि.ली.च्या ३८४ बाटल्या आणि ७५० मि.ली.च्या २४ सीलबंद बाटल्या आढळून आल्या. या कारवाईत २ लाख ५४ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
या दोन्ही कारवाया उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने केल्या असून अवैध मद्य वाहतूक रोखण्यासाठी पुढील काळातही अशा धडक कारवाया सुरू राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.