नालासोपाऱ्यात किरकोळ भांडणात भावाचं विवाहीत बहिणीवर कोयत्याने वार, आईवरही हल्ला; बहिणीचा दुर्दैवी मृत्यू, आरोपी भावाला अटक

Spread the love

नालासोपाऱ्यात किरकोळ भांडणात भावाचं विवाहीत बहिणीवर कोयत्याने वार, आईवरही हल्ला; बहिणीचा दुर्दैवी मृत्यू, आरोपी भावाला अटक

योगेश पांडे / वार्ताहर

नालासोपारा – नालासोपारा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, मनोरुग्ण भावाने आपल्या सख्ख्या बहिणीची कोयत्याने वार करून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या आईवरही मुलाने हल्ला केला. नालासोपारा पूर्वेच्या टाकी रोड येथील सर्वोदय वसाहतीत मंगळवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे. वसई विरार शहरातील एकाच आठवड्यातील ही चौथी हत्या आहे.

टाकी रोड येथील सर्वोदय वसाहतीत साईधाम वेल्फेअर चाळ आहे. या चाळीत सुप्रिया कानडे (३५) ही महिला राहते. तिची आई आणि भाऊ शेजारीच राहतात. महिलेचा पती गावी गेला होता. मंगळवारी पहाटे तिचा सख्खा भाऊ अजित मालुष्टे (४०) याच्यासोबत भांडण झाले. या भांडणात अजित मालुष्टे (४०) याने कोयत्याने तिच्यावर वार केला. तिच्या मानेवर आणि छातीवर कोयत्याचे वार झाल्याने ती या हल्ल्यात गंभीर जखमी झाली आहे. भांडण सोडविण्यासाठी त्यांची आई मध्ये पडली तेव्हा अजितने तिच्यावरही वार केले. ती गंभीर जखमी झाली. या घटनेमध्येच सुप्रियाचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी असलेल्या आईला पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मला सकाळी साडेपाच वाजता या घटनेची माहिती मिळाली, तेव्हा सुप्रिया रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिचा भाऊ मनोरुग्ण होता. त्याने कोयत्याचा वार करून तिची हत्या केली अशी माहिती स्थानिक रहिवाशी महेंद्र कदम यांनी दिली. तुळींज पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली आहे.

पुढे बोलताना परिसरातील रहिवासी महेंद्र कदम यांनी सांगितलं की, मला समजलं शेजारी मोठं भांडण झालं आहे. त्या इमारतीमध्ये मी पहाटे पाच ते साडे पाच वाजण्याच्या सुमारास गेलो होतो. तिथे एका महिलेचा खून करण्यात आला होता. तिच्या लहान भावानेच तिला मारलं. मयत महिला आहे तिचे नाव सुप्रिया कानडे असं आहे, तर आरोपीचे नाव हे अजित मालुष्टे आहे. अजित मनोरूग्ण आहे, त्याच्यावरती उपचार सुरू आहेत, त्यानेच आपल्या बहिणीवर हल्ला केला त्यात त्याच्या बहिणीचा मृत्यू झाला तर मध्ये पडलेल्या आईवरती देखील त्याने वार केले आहेत, त्याची आई देखील जखमी झाली आहे, अशी माहिती परिसरात राहणाऱ्या रहिवाश्यांनी दिली आहे, तर या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं, पोलिस घटनेचा तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon