भिवंडी महापालिकेत ‘चंद्रपूर पॅटर्न’ची चर्चा; महापौरपदासाठी सत्तासमीकरणाची जुळवाजुळव
योगेश पांडे / वार्ताहर
भिवंडी : महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिवंडी महानगरपालिकेत सत्तासमीकरणे वेगाने बदलताना दिसत असून ‘चंद्रपूर पॅटर्न’ राबवण्याच्या हालचालींमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. बहुमताचा आकडा जुळवण्यासाठी काँग्रेस आणि भाजपमध्ये हातमिळवणीची चर्चा सुरू असून, अडीच-अडीच वर्षे महापौरपद वाटून घेण्याचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांकडून मिळते.
भिवंडी महापालिकेच्या आजवरच्या इतिहासात अनेकदा सर्वाधिक संख्याबळ नसतानाही आघाडीतील पक्षाचा महापौर बसल्याचे उदाहरणे आहेत. याच पार्श्वभूमीवर यंदा महापौरपदासाठी १० तर उपमहापौरपदासाठी ७ अर्ज दाखल झाले असून, त्यातील बहुतांश अर्ज अपक्ष तसेच आघाडीतील नगरसेवकांनी भरल्याचे चित्र आहे. दरम्यान, भाजप भिवंडीत चंद्रपूर येथील यशस्वी ठरलेला ‘चंद्रपूर पॅटर्न’ राबवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
चंद्रपुरात काँग्रेसला गाफील ठेवत भाजपने तत्कालीन ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या मदतीने महापौरपद मिळवले होते. त्याच धर्तीवर भिवंडीत काँग्रेसकडे ३० तर भाजपकडे २२ जागा असून, दोन्ही पक्ष मिळून ५२ जागांचा आकडा गाठतात. बहुमतासाठी ४६ जागांची गरज असताना, अडीच-अडीच वर्षे महापौरपद तसेच इतर महत्त्वाची पदे वाटून घेण्याचा फॉर्म्युला ठरल्याचे सांगितले जाते.
दुसरीकडे, भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी शिवसेना (एकनाथ शिंदे) गटाने ‘केडीएमसी पॅटर्न’नुसार रणनीती आखल्याची चर्चा आहे. या पर्यायात काँग्रेस (३०), शिवसेना (१२) आणि कोणार्क विकास आघाडी यांच्या मदतीने सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, कोणार्क विकास आघाडीचे नेते विलास पाटील सध्या एका फसवणूक प्रकरणात तुरुंगात असल्याने या आघाडीसमोर अडचणी वाढल्या आहेत. महापौर निवडणुकीच्या तोंडावर ही अटक राजकीय खेळी असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.
दरम्यान, काँग्रेस, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) आणि समाजवादी पार्टी असा ‘सेक्युलर फ्रंट’ उभारण्याचे प्रयत्न झाले होते. मात्र, आवश्यक संख्याबळ जुळत नसल्याने हा पर्याय सध्या कमकुवत ठरत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. महापौरपदाच्या निवडणुकीपूर्वीच भिवंडीत सत्तासंघर्ष रंगात आला असून, अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.