पोलीस असल्याचं भासवून वृद्धांचे दागिने लंपास करणारा सराईत इराणी गुन्हेगार जेरबंद
योगेश पांडे / वार्ताहर
पिंपरी-चिंचवड : पोलीस असल्याचं भासवून वयोवृद्ध महिला-पुरुषांना बोलण्यात गुंतवून हातचलाखीने सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या सराईत इराणी गुन्हेगाराला पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने अटक केली. मोहम्मद सय्यद कंबर अली (रा. अंबिवली, ठाणे) असे आरोपीचे नाव आहे.
हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वृद्ध महिलेचे दागिने लंपास झाल्याच्या तक्रारीनंतर तपासाला गती देण्यात आली. विनय कुमार चौबे यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेने १००हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा ठावठिकाणा निष्पन्न केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार व पथकाने अंबिवली परिसरात वेशांतर करून दबा धरत आरोपीला झडप घालून ताब्यात घेतले.
तपासात आरोपीने हिंजवडी व देहूरोड परिसरात अशाच प्रकारचे गुन्हे केल्याची कबुली दिली असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. अधिक तपास सुरू आहे.