वंदे भारतच्या शौचालयात साप ठेवणारा आरोपी मुंब्र्यातून अटक; सीसीटीव्हीत धक्कादायक प्रकार कैद

Spread the love

वंदे भारतच्या शौचालयात साप ठेवणारा आरोपी मुंब्र्यातून अटक; सीसीटीव्हीत धक्कादायक प्रकार कैद

पोलीस महानगर नेटवर्क

मुंबई : वंदे भारत एक्सप्रेसमधील एका शौचालयात साप ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी ३७ वर्षीय जगन अर्जुन भाले याला मुंब्रा येथून अटक करण्यात आली आहे. रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ)ने तत्पर कारवाई करत काही तासांत आरोपीचा छडा लावला.

२७ डिसेंबर रोजी गाडी क्रमांक २२२२५ च्या सी–१६ कोचमधील शौचालयात साप आढळून आल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच संबंधित शौचालय तात्काळ बंद करण्यात आले आणि नियंत्रण कक्षाला कळवण्यात आले. त्यानंतर सोलापूर स्थानकावर सापाला पकडण्यात यश आले.

या घटनेची गंभीर दखल घेत आरपीएफने सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, एका व्यक्तीने मुद्दाम शौचालयात साप ठेवत असल्याचे स्पष्ट दिसून आले. आरोपीविरुद्ध रेल्वे कायदा १९८९ अंतर्गत कलम १४५ (ब), १४७ आणि १५३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष तपास पथक नेमून गुप्त माहितीच्या आधारे संशयिताची ओळख पटवण्यात आली.

नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या जगन अर्जुन भाले याला १२ फेब्रुवारी रोजी मुंब्रा येथून अटक करण्यात आली. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. त्याला कल्याण न्यायालय येथे हजर करण्यात आले असता न्यायालयाने १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

या कारवाईमुळे मध्य रेल्वेच्या आरपीएफने पुन्हा एकदा आपली सतर्कता आणि कार्यतत्परता अधोरेखित केली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत अशा प्रकारच्या घटनांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही अधिकाऱ्यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon