पत्नी तक्रार देण्यासाठी आल्याने संतप्त पोलिस कर्मचाऱ्याचा गोंधळ; उपनिरीक्षकावर हल्ला, गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
नागपूर : पत्नी तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात आल्याने संतप्त झालेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने मोठा गोंधळ घालत पोलिस उपनिरीक्षकावर हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना लकडगंज पोलिस ठाणे येथे घडली.
या प्रकरणी किरण विश्वनाथ कुकलारे असे आरोपी पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून, त्याच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला करणे तसेच इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पोलिस कर्मचाऱ्याची पत्नी तक्रार दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यात आली होती. याच कारणावरून आरोपी संतप्त झाला आणि पोलिस ठाण्यात आरडाओरड करत उपस्थित कर्मचाऱ्यांशी वाद घालू लागला. वाद विकोपाला गेल्यानंतर त्याने थेट कर्तव्यावर असलेल्या पोलिस उपनिरीक्षकावर हल्ला केला.
घटनेनंतर पोलिस ठाण्यात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. पुढील तपास सुरू असून आरोपीविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.