भायखळ्यात १८ मजली इमारतीची लिफ्ट कोसळली; ५ जण गंभीर जखमी
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मध्य मुंबईतीलभायखळा परिसरात असलेल्या ‘जयकृपा टॉवर’मध्ये बुधवारी रात्री उशिरा एक भीषण घटना घडली.१८ मजली इमारतीची लिफ्ट कोसळल्याने ५ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घोडापदेव क्रॉस लेन क्रमांक १ येथील ‘जयकृपा टॉवर’ या १८ मजली इमारतीमध्ये बुधवारी रात्री १० वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. इमारतीची लिफ्ट चौथ्या मजल्यावर असताना अचानक तांत्रिक बिघाड झाला आणि ती थेट तळमजल्यावर कोसळली. मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाने या घटनेला दुजोरा दिला.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, लिफ्टच्या केबलमध्ये बिघाड झाल्याने किंवा केबल तुटल्याने हा अपघात झाला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. लिफ्ट चौथ्या मजल्यावरून वेगाने खाली कोसळल्याने लिफ्टमधील प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच प्रशासन तातडीने कामाला लागले. मुंबई अग्निशमन दल, स्थानिक पोलीस आणि वॉर्ड कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. बेस्टचे कर्मचारी आणि रुग्णवाहिका देखील तातडीने पाचारण करण्यात आल्या. या घटनेत पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यापैकी तिघांना जेजे रुग्णालयात, एकाला बालाजी रुग्णालयात, तर अन्य एकाला जसलोक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या घटनेमुळे लिफ्टच्या सुरक्षेचा आणि देखभालीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलीस आणि संबंधित विभाग या घटनेची सखोल चौकशी करत आहेत.