अहिल्यानगरमध्ये नृत्यांगनेवर एकतर्फी प्रेमातून जीवघेणा हल्ला; आरोपी फरार

Spread the love

अहिल्यानगरमध्ये नृत्यांगनेवर एकतर्फी प्रेमातून जीवघेणा हल्ला; आरोपी फरार

योगेश पांडे / वार्ताहर

अहिल्यानगर – महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड शहरात एक अतिशय खळबळजनक घटना घडली आहे. फोनवर बोलत नसल्याचा आणि नंबर ब्लॉक केल्याचा राग मनात धरून एका तरुणाने नृत्यांगनेवर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात पीडिता गायत्री तुषार सावंत (२६) गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

गायत्री सावंत ही नृत्यांगना म्हणून काम करते आणि तिची मैत्रीण मनिषा प्रकाश जावळे यांच्यासोबत राहते. तिची आरोपी राहुल अशोक कचरे याच्याशी मागील पाच वर्षांपासून ओळख होती. २०२४ पासून मात्र दोघांमधील संबंध तुटले होते. यापूर्वीही गायत्रीने राहुलविरोधात तक्रार दाखल केली होती. पण गायत्री बोलत नसल्याच्या रागातून राहुलने धक्कादायक पाऊल उचलले.

गुरुवार, ५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजता राहुलने गायत्रीला फोन करून धमकी दिली होती. तो फोनवर “तू माझ्याशी बोल, माझे तुझ्यावर प्रेम आहे. बोलली नाहीस तर मारून टाकीन” अशी थेट धमकी दिली होती. राहुलचे बोलणे ऐकून गायत्रीला प्रचंड राग आला. तिने थेट राहुलचा फोन कट केला. त्यानंतर शुक्रवार, ६ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे सुमारे २ वाजता, गायत्री तिच्या खोलीत मनिषासोबत होती. मनिषा बाल्कनीत होती. त्याचवेळी राहुल इमारतीजवळ दबा धरून होता. तो हातात कोयता घेऊन थेट खोलीत घुसला आणि ओरडला, “तू माझ्याशी का बोलत नाहीस? माझा नंबर का ब्लॉक केला?” असा प्रश्न विचारला. त्यानंतर त्याने गायत्रीच्या डोक्यावर, हातावर आणि बोटांवर कोयत्याने वार केले. ती गंभीर जखमी झाली.

मैत्रीण मनिषाने आरोपीला थांबवण्याचा प्रयत्न केला आणि “मारू नको” अशी विनंती केली, पण राहुलने शिवीगाळ करत “मी तुला संपवून टाकणार” अशी धमकी देऊन घटनास्थळावरून पळ काढला.पीडित गायत्री सावंत यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस ठाण्यात राहुल अशोक कचरेविरोधात खुनाचा प्रयत्न असा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. ही घटना एकतर्फी प्रेमातून घडली आहे. स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon