नवी मुंबईत मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविण्याचा धक्कादायक प्रकार; कारवर ‘पोलीस’अशी नेमप्लेट आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचे ओळखपत्र सापडल्याने खळबळ
योगेश पांडे / वार्ताहर
नवी मुंबई – नवी मुंबईत मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. करावे गाव परिसरात भरधाव वेगात असलेल्या इनोव्हा कारने रस्त्यावर उभी तसेच सुरू असलेली अनेक वाहने जोरदारपणे धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे अपघात करणाऱ्या कारवर ‘पोलीस’ अशी नेमप्लेट असून, वाहनातून वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचे ओळखपत्र सापडल्याने प्रकरण अधिकच गंभीर बनलं आहे.
घटना घडली त्यावेळी रस्त्यावर वर्दळ होती. अचानक भरधाव इनोव्हा कारने एका मागोमाग एक वाहनांना धडक दिल्याने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झालं. अपघाताचा आवाज इतका भीषण होता की नागरिकांनी धाव घेत घटनास्थळी गर्दी केली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कारचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचं स्पष्टपणे जाणवत होते. नशेत वाहन चालवल्यामुळेच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडल्याचं सांगण्यात येत आहे.
अपघातानंतर इनोव्हा कारची तपासणी केली असता, वाहनावर ‘पोलीस’ अशी नेमप्लेट असल्याचे आढळून आली. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि संताप व्यक्त करण्यात आला. पुढील तपासात कारमधून मुंबई पोलिसांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण बबन पोखरकर यांचे ओळखपत्र सापडल्याची माहिती मिळत आहे. ही बाब समोर आल्यानंतर ‘कायद्याचे रक्षकच कायदा मोडत आहेत का?’ असा सवाल उपस्थित होत असून, प्रकरणाला वेगळे वळण मिळालं आहे.
सामान्य नागरिकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास तात्काळ कारवाई केली जाते. मात्र, पोलिसांच्या नावाची नेमप्लेट असलेल्या वाहनामुळे नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सोशल मीडियावरही या घटनेची चर्चा सुरू असून, दोषी व्यक्ती कोणही असो, कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहनांची पाहणी करण्यात आली असून, नुकसानग्रस्त वाहनचालकांचे जबाब नोंदविण्यात येत आहेत. तसेच संबंधित इनोव्हा कार नेमकी कोण चालवत होती, ती व्यक्ती प्रत्यक्षात पोलीस अधिकारीच होती की ओळखपत्र आणि नेमप्लेटचा गैरवापर करण्यात आला आहे, याचा सखोल तपास सुरू आहे. चालकाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली का, रक्तनमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.