रस्त्यावर उभ्या कारांची काच फोडून मोल्यवान वस्तु चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफास; अंबोली पोलीसांनी भिवंडी येथून ठोकल्या बेड्या

Spread the love

रस्त्यावर उभ्या कारांची काच फोडून मोल्यवान वस्तु चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफास; अंबोली पोलीसांनी भिवंडी येथून ठोकल्या बेड्या

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरात रस्त्यावर उभ्या असलेल्या बंद कारची काच फोडून त्यातील लॅपटॉप, मोबाईल आणि रोख रक्कम चोरी करणाऱ्या टोळीला आंबोली पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीने आतापर्यंत एकूण १८ चोरीचे गुन्हे केल्याचे तपासात उघड झाले असून, आरोपींकडून ३ लाख २५ हजार रुपयांची चोरीची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

मुंबईतील जोगेश्वरी पश्चिम भागातील आंबोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या सब टीव्ही लेन परिसरात रस्त्यावर उभी असलेल्या एका कारची काच फोडून लॅपटॉप व रोख रक्कम चोरी करण्यात आली होती. या घटनेनंतर आंबोली पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील ७० ते ८० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी भिवंडीच्या नारपोली परिसरातून आरोपींना अटक केली. महेश उर्फ गौतम नायडू (२२), जय कुमार विलसानी (२४) आणि सदा वीरा मनी नायडू (३६) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे तिघेही दिल्ली आणि तामिळनाडू राज्यातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

तपासात उघड झाल्यानुसार, ही टोळी दिल्लीहून थेट मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरात येत, रस्त्यावर उभ्या असलेल्या बंद कारची काच फोडून चोरी करत होती. चोरी केलेले लॅपटॉप, मोबाईल आणि रोख रक्कम हे आरोपी आपल्या साथीदारांच्या मदतीने तामिळनाडू येथे विक्री करत असल्याचेही समोर आले आहे.

या आरोपींकडून आंबोली पोलिसांनी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील एकूण १८ कारफोडीचे गुन्हे उघडकीस आणले असून, त्यातील ३ लाख २५ हजार रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. या आरोपींनी मुंबई शहरात आणखी किती ठिकाणी कारमधून चोरी केली आहे, तसेच या टोळीत आणखी कोणते साथीदार सहभागी आहेत का, याचा सखोल तपास आंबोली पोलीस करत आहेत. दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना कारमध्ये मौल्यवान वस्तू, लॅपटॉप, मोबाईल किंवा रोख रक्कम ठेवू नये, तसेच वाहन पार्क करताना सुरक्षित ठिकाणांची निवड करावी, असे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon