दरोड्याच्या प्रयत्नाचा गुन्हा उघड; दोन सराईत आरोपी जेरबंद
पालघर पोलिसांची यशस्वी कामगिरी
पालघर : वाडा तालुक्यातील शिंदेवाडी येथील फार्महाऊसमध्ये घडलेल्या दरोड्याच्या प्रयत्नाचा गुन्हा उघड करत पालघर पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
दिनांक २४ डिसेंबर २०१५ रोजी पहाटे सुमारे १.५० वाजण्याच्या सुमारास, वाडा तालुक्यातील शिंदेवाडी फार्महाऊस येथे राहणारे गंधीलकुमार वेलमु रुगन (वय ३१) हे झोपेत असताना अनोळखी आरोपींनी त्यांच्या खोलीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. आवाजामुळे जागे झालेल्या रुगन यांनी बाहेर येताच, चार अनोळखी इसमांनी त्यांना चाकूचा धाक दाखवत खोलीत नेले. त्यांचे कपडे फाडून त्याच कपड्यांनी हातपाय बांधत, आरडाओरड केल्यास ठार मारण्याची धमकी देत पैसे कुठे ठेवले आहेत, अशी विचारणा केली.
यानंतर आणखी तीन ते चार आरोपी घटनास्थळी आले. आरोपींनी खोलीतील कपाटे व मोबाईल तपासले; मात्र काहीही हाती न लागल्याने, फिर्यादीला खोलीत डांबून ठेवत बाहेर न येण्याची धमकी देऊन आरोपी फरार झाले. या प्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५२०/२०१५ नोंदविण्यात आला आहे.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखा व वाडा पोलीस ठाण्याची विशेष पथके तयार करून तपासाचे आदेश दिले. तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे तपास करताना आरोपींनी गुन्ह्यासाठी इको कार (एमएच-१५ जीएफ-४४५७) वापरल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार पोलिसांनी हामी अजबसिंग टाक (वय ५२) व राजेंद्रसिंग महिपालसिंग बावरी (वय ३१), दोघेही रा. सद्गुरुनगर, अमरावती, यांना २९ जानेवारी २०१६ रोजी अटक केली. न्यायालयाने त्यांना ३ फेब्रुवारी २०१६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
तपासात वापरण्यात आलेली इको कार ही भुसावळ येथील डेनी जोसेफ रॉय यांची असून ती २३ डिसेंबर २०१५ रोजी चोरीस गेल्याचे उघड झाले. या चोरीप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल आहे. गुन्ह्यात वापरलेली कार व हत्यारे पोलिसांनी जप्त केली आहेत.
अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी हामी अजबसिंग टाक याच्यावर नवी मुंबई, अमरावती, हिंगोली, वर्धा जिल्ह्यांत १६ गुन्हे दाखल असून, राजेंद्रसिंग बावरी याच्यावरही अमरावती, परभणी, हिंगोली व नागपूर जिल्ह्यांत गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील सावंत देसाई, तसेच अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवंत चौधरी करीत आहेत.