डोंबिवलीत ‘शोरमा गर्ल’ एकता सावंतचा स्टॉल पुन्हा सुरू; अविनाश जाधव यांच्या हस्ते शुभारंभ
पोलीस महानगर नेटवर्क
डोंबिवली : डोंबिवलीतील ‘शोरमा गर्ल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकता सावंत हिचा शोरमाचा स्टॉल अखेर पुन्हा सुरू झाला आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांच्या हस्ते या स्टॉलचा शुभारंभ करण्यात आला.
काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या कारवाईत एकता सावंतचा स्टॉल बंद करण्यात आला होता. या कारवाईनंतर एकता हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली कैफियत मांडत उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याचे सांगितले होते आणि मदतीचे आवाहन केले होते. तिच्या या पोस्टला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता.
या प्रकरणाची दखल घेत मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी पुढाकार घेत संबंधित यंत्रणांशी समन्वय साधत एकता सावंतचा स्टॉल पुन्हा सुरू करण्यासाठी मदत केली. त्यानंतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून स्टॉल पुन्हा सुरू करण्यात आला.
स्टॉलच्या पुनःशुभारंभावेळी उपस्थित नागरिकांनी एकता सावंतचे कौतुक करत तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कष्टकरी तरुणीला पुन्हा उभे राहण्याची संधी मिळाल्याने या घटनेचे सर्वत्र स्वागत होत आहे.