पुण्यात गांजाची मोठी खेप पोहोचविण्याची तयारी; ‘सर्पमित्र’ म्हणून प्रसिद्ध युट्यूबरचा तस्करीचा पर्दाफाश
योगेश पांडे / वार्ताहर
अहिल्यानगर : समाजमाध्यमांवर ‘सर्पमित्र’ म्हणून ओळख निर्माण केलेल्या अहिल्यानगरमधील एका युट्यूबरचा खरा चेहरा उघडकीस आला आहे. सापांचे रेस्क्यू करून पर्यावरणप्रेमी अशी प्रतिमा जोपासणारा आकाश जाधव हा कोट्यवधी रुपयांच्या गांजाच्या तस्करीचा सूत्रधार असल्याचे समोर आले असून, छत्तीसगडच्या महासमुंद पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.
७ जानेवारी रोजी महासमुंद पोलिसांनी संशयावरून एका रुग्णवाहिकेची झडती घेतली असता, त्यामधून तब्बल ५ क्विंटल २० किलो गांजा जप्त करण्यात आला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या गांजाची किंमत सुमारे २ कोटी ६० लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात सुरुवातीला तीन तस्करांना अटक करण्यात आली होती. मात्र, त्यांच्या चौकशीतून या संपूर्ण रॅकेटचा मास्टरमाइंड आकाश जाधव असल्याचे निष्पन्न झाले.
आकाश जाधव हा सोशल मीडियावर स्वतःला सर्पमित्र आणि पर्यावरण रक्षक म्हणून सादर करत होता. सापांचे रेस्क्यू करतानाचे त्याचे व्हिडिओ लाखो लोक पाहत होते. युट्यूबवर त्याचे तब्बल ५६ लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स असून, इंस्टाग्रामवरही तीन लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. मात्र, या लोकप्रियतेच्या आणि विश्वासाच्या आडून तो ओडिशावरून महाराष्ट्रात, विशेषतः पुण्यात गांजाची मोठी खेप पोहोचविण्याच्या तयारीत होता.
पोलिसांचा संशय टाळण्यासाठी तस्करीसाठी रुग्णवाहिकेचा वापर करण्यात येत असल्याचे तपासात उघड झाले आहे. चेकपोस्टवर कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी ही युक्ती वापरली जात होती. सोशल मीडियावरची ‘स्वच्छ’ प्रतिमा हीच तस्करीसाठी सुरक्षित कवच ठरत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
पुण्यात गांजाची खेप पोहोचण्यापूर्वीच महासमुंद पोलिसांनी ही कारवाई करून जाधवच्या मुसक्या आवळल्या. या घटनेनंतर समाजमाध्यमांवरील इन्फ्लुएन्सर्सच्या वाढत्या प्रभावासोबतच त्यांच्या पार्श्वभूमी आणि गैरप्रवृत्तींबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.