राजकीय स्वार्था पोटी एका पित्याने आपल्या पोटच्या मुलीची केली हत्या; थरारक प्रकरणात विद्यमान सरपंचालाही अटक

Spread the love

राजकीय स्वार्था पोटी एका पित्याने आपल्या पोटच्या मुलीची केली हत्या; थरारक प्रकरणात विद्यमान सरपंचालाही अटक

योगेश पांडे / वार्ताहर

नांदेड – राजकारण लै बेकार गोष्ट असते असं म्हटलं जातं, असाच काहीसा प्रत्यय नांदेडमधील खळबळजनक घटनेने आला आहे. राजकीय स्वार्था पोटी एका पित्याने आपल्या पोटच्या मुलीला कालव्यात फेकून देऊन हत्या केल्याची संतापजनक घटना घडली होती. या प्रकरणी तेलंगणा पोलिसांनी सुरुवातीला पित्याला अटक केली होती, त्यानंतर आता मुखेड तालुक्यातील केरूर गावच्या सरपंचाला देखील ताब्यात घेतले आहे. सरपंच होण्याची ईच्छा आरोपी पित्याला होती, पण तीन आपत्य असल्याने आरोपीने जुळ्या असलेल्या दोघांपैकी एका सात वर्षांच्या मुलीची हत्या केली. विशेष म्हणजे विद्यमान सरपंच गणेश शिंदे या आरोपीने हा सल्ला दिल्याचं तपासात समोर आल्याची माहिती आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

आरोपी पांडुरंग बाबुराव कोंडमंगले (३२) हा मुळ मुखेड तालुक्यातील केरूर येथील रहिवासी आहे. त्याला तीन अपत्ये असून त्यापैकी दोघे जुळे आहेत. बाऱ्हाळी नाका येथे त्याची कटिंगची दुकान आहे. आगामी ग्राम पंचायत निवडणुकीत त्याची सरपंच होण्याची इच्छा होती, त्याने तशी तयारी देखील सुरु केली होती, मात्र तीन आपत्य त्याच्यासाठी अडसर ठरत होते. गावातील विद्यमान सरपंच असलेल्या गणेश शिंदे यानेदेखील तीन अपत्य असल्याने तूला निवडणूक लढता येणार नाही असा वारंवार आरोपीस सल्ला दिला. सरपंच हा आरोपी पांडुरंग कोंडमंगले याचा खास मित्र आहे.

तीन अपत्य असल्याने आपल्याला निवडणूक लढता येणार नाही हा विचार त्याच्या मनात सुरु होता. सरपंचाच्या मदतीने एका मुलीला दत्तक देण्याचा विचार केला होता, एवढच नाही तर जुळ्या मुलीचा पुण्यात जन्म झाल्याने आरोपीने पुणे येथे महापालिका कार्यालयात जाऊन जन्म प्रमाणपत्रातील पित्याचं नाव बदलण्याच प्रयत्न देखील केला, पण ते शक्य झालं नाही. तेव्हा तीन पैकी एका मुलाची हत्या करण्याचा षडयंत्र पांडुरंग आणि सरपंच गणेश शिंदे याने रचले. त्यानुसार २९ जानेवारी रोजी त्याने आपल्या सात वर्षाच्या प्राची नामक मुलीला गाडीवर बसवून नांदेडला जातं आहे अस पत्नीला सांगितले.

पुढे त्याने तेलंगणा राज्यातील निझामाबाद जिल्ह्यातील एडपल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निजामसागर डॅम्पच्या एका कालव्यात जिवंत फेकून दिले. त्यानंतर तो घरी परतला आणि मुलगी हरवल्याचे सांगितले. दरम्यान मुलीचा मृतदेह केनॉलमध्ये आढळल्यानंतर एडपल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला.मुखेड पोलिसांच्या मदतीने तेलंगणा पोलिसांनी पित्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. सुरुवातीला आर्थिक विवंचनेतून हा कृत्य केल्याचे सांगतिले, त्यानंतर सात ते आठ वेगवेगळे जवाब दिले.पोलिसांनी खाकी वर्दीचा धाक दाखवताच त्याने सत्य सांगितले. निवडणूकीत तिसरं अपत्य अडसर ठरत असल्याने सात वर्षाच्या मुलीची हत्या केल्याचे सांगितले.

दरम्यान, पोलिसांनी सरपंच गणेश शिंदे याला देखील ताब्यात घेतले आहे. तेलंगना पोलिसांनी दोघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. केवळ राजकीय स्वार्था पोटी पित्याने पोटच्या मुलीची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon