सहा महिन्यांत सेवानिवृत्ती असताना टोकाचा निर्णय; नायब तहसीलदाराने रेल्वेखाली उडी घेत संपवले आयुष्य
पोलीस महानगर नेटवर्क
अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक कर विभाग तसेच मुख्यमंत्री सचिवालय कक्ष विभागात कार्यरत असलेले नायब तहसीलदार किरण रामदास देवतरसे (वय ५८) यांनी रविवारी निंबळक परिसरात रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. अवघ्या सहा महिन्यांत ते सेवानिवृत्त होणार होते. या घटनेमुळे महसूल प्रशासनात खळबळ उडाली असून सर्वत्र शोककळा पसरली आहे.
देवतरसे हे अनुभवी व कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून ओळखले जात होते. रविवारी सकाळी त्यांनी घराबाहेर पडून निंबळक रेल्वे मार्ग गाठला आणि येणाऱ्या रेल्वेखाली उडी घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून आत्महत्येमागील कारणांचा तपास सुरू आहे.
सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना त्यांनी घेतलेला हा टोकाचा निर्णय सर्वांनाच हादरवणारा ठरला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले असा परिवार असून कुटुंबीयांनी शोकाकुल अवस्थेत तीव्र आक्रोश केला. प्रशासनातील सहकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देवतरसे यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
या प्रकरणाचा तपास रेल्वे पोलिस व स्थानिक पोलिसांकडून सुरू असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.