ठाणेकरांसाठी वॉटर अलर्ट! या भागात २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – पुढील काही दिवस ठाणे शहरातील नागरिकांना पाणी जपून वापरावं लागेल. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जलपुरवठा योजनेअंतर्गत येणाऱ्या जांभुल जलशुद्धीकरण केंद्रातील जलाशयात दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरात गुरुवारी, २९ जानेवारी रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते शुक्रवारी, रात्री १२ वाजेपर्यंत २४ तास पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे.
एमआयडीसी मार्फत ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील मुंब्रा, दिवा, कळवा, माजीवाडा-मानपाडा आणि वागले प्रभाग समितीच्या काही भागांना पाणीपुरवठा केला जातो. दुरुस्ती कामाच्या काळात या सर्व भागांमध्ये पाणीपुरवठा तात्पुरता खंडित राहणार आहे.
विशेषतः दिवा, मुंब्रा (प्रभाग क्रमांक २६ व ३१ मधील काही भाग वगळता) आणि कळवा प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या सर्व भागांमध्ये २४ तास पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. याशिवाय वागले प्रभाग समितीतील रूपा देवी पाडा, किसननगर क्रमांक-२, नेहरू नगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव परिसरातही पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांना आधीच आवश्यक तेवढा पाणीसाठा करून ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतर कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सहकार्य करावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.