खाकी वर्दीतला ड्रग्ज माफिया; पुणे पोलिसांकडून तस्करी करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यासह टोळीला बेड्या
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – सदरक्षणाय खलनिग्रहनाय या ब्रीदला अनुसरुन पोलीस काम करतात, म्हणजे गुन्हेगारांचे कर्दनकाळ सज्जनांचे रक्षक म्हणून पोलिसांकडे पाहिले जाते. मात्र, पोलिसांच्या खाकी वर्दीला काळा डाग लावण्याचं काम अहिल्यानगर पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याने केलं आहे. अहिल्यानगर पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल शामसुंदर गुजर आणि त्याच्या टोळीला अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांकडून अटक करण्यात आली. अहिल्यानगर पोलीस दलातील काही अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात असून अहिल्यानगर पोलिसांनी जप्त केलेले अंमली पदार्थ मुद्देमाल कक्षातून चोरुन हा कॉन्स्टेबल हे अंमली पदार्थ बाहेर विकत होता. अहिल्यानगर पोलिस दलातील कॉन्स्टेबल शामसुंदर गुजर हा स्वतः अंमली पदार्थांची विक्री करत असल्याचं समोर आलंय. या प्रकरणात अहिल्यानगर पोलीस दलातील आणखी कोणी पोलीस अधिकारी सहभागी आहेत का याचा तपास पुणे पोलिसांकडून सुरू आहे
अहिल्यानगर पोलिसाच्या सहभागाच्या या प्रकरणाची सुरुवात झाली १७ जानेवारीला, जेव्हा पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील शादाब शेख या गॅरेज चालकाला पुणे पोलिसांनी अटक केली. शादाब शेख हा त्याच्या दुचाकीवरुन अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार असल्याचं पुणे ग्रामीण पोलिसांना समजलं होतं. पोलिसांनी त्याला एक किलो अंमली पदार्थसह रंगेहात पकडलं. अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ज्ञानदेव उर्फ माऊली शिंदे, ऋषिकेश चित्तर, महेश गायकवाड यांच्याकडून त्याने अंमली पदार्थ आणल्याचे त्याच्याकडे केलेल्या चौकशीतून समोर आलं आहे.
पुणे पोलिसांनी या आरोपींना अटक केली असता त्यांच्याकडे उर्वरित ९ किलो ६५५ ग्रॅम वजनाचे अमली पदार्थ मिळून आले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ कुठून आणले याचा पोलिसांनी पुढे शोध सुरू केला असता हे अमली पदार्थ नगर पोलीस दलातील शामसुंदर गुजर याने त्यांना दिल्याचं समोर आलं. शामसुंदर गुजर हा अहिल्यानगर पोलीस दलात पोलीस हवालदार पदावर कार्यरत आहे. आत्तापर्यंत या प्रकरणात १० किलो ७०७ ग्रॅम वजनाचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. श्यामसुंदर गुजर हा हवालदार मुद्देमाल कक्षात ठेवण्यात आलेल्या अमली पदार्थांच्या गुन्ह्यात जप्त करण्यात आलेले अमली पदार्थ काढून त्याची विक्री करत असल्याने पोलीस दलात खळबळ उडाली.
पुण्यातील शिरूर शहरात गॅरेज चालकाच्या माध्यमातून मिळालेल्या अमली पदार्थाचे धागे धोरे अहिल्यानगर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यापर्यंत पसरले आहेत. पोलिसांनी एकूण पाच आरोपींना पुणे ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतलं असून १० किलो ७०० ग्रॅम वजनाचे अंमली पदार्थांसोबत गुन्ह्यात वापरलेली वाहने हस्तगत केली आहेत. पोलिसांनी जप्त केलेले अंमली पदार्थ कोर्टाच्या आदेशानुसार सील केले जातात आणि अधिकाऱ्यांच्या सहीने मुद्देमाल कक्षात ठेवले जातात. शामसुंदर गुजर जप्त केलेला मुद्देमाल काढून त्या जागी तशाच दिसणाऱ्या वस्तु ठेवत होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहभागाशिवाय हे शक्य नसल्याचं मानलं जातं आहे. अहिल्यानगर पोलिसांनी मे २०२५ मधे श्रीरामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जप्त केलेला हा मुद्देमाल होता. डिसेंबर महिन्यात श्यामसुंदर गुजरने तो मुद्देमाल कक्षातून चोरला होता. दरम्यान, राजकीय लोकाचा यात सहभाग अजून तरी आढळून आलेला नाही. मात्र, याप्रकरणी अधिक तपास करायचा आहे, असे पुणे ग्रामीण पोलिसांनी सांगितले.