नवऱ्याला सोडून मित्रासोबत लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या पत्नीची पतीकडून हत्या; आरोपी पतिला अटक
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – चारित्र्याच्या संशयातून आणि पत्नी दुसऱ्या व्यक्तीसोबत राहत असल्याच्या रागातून पतीने पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील वाडेबोल्हाई परिसरात उघडकीस आली आहे. दागिन्यांच्या देवाणघेवाणीचा बहाणा करत पतीने पत्नीला भेटीस बोलावले आणि तिथेच चाकूने वार करत तिचा खून केला. या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी पतीला अटक केली आहे.
नम्रता शैलेंद्र व्हटकर (१९) असे मृत विवाहितेचे नाव असून, शैलेंद्र प्रकाश व्हटकर (३०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. या हत्याप्रकरणी नम्रताचा प्रियकर शाहरुख दस्तगीर पठाण (२३) याने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नम्रता आणि शैलेंद्र यांचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. मात्र, सहा महिन्यांपूर्वी नम्रता एका खासगी कंपनीत नोकरी करत असताना तिची ओळख शाहरुख पठाण याच्याशी झाली. या ओळखीचे पुढे रूपांतर जवळिकीमध्ये झाले. याची माहिती पती शैलेंद्रला लागल्यानंतर दोघांमध्ये वारंवार वाद होऊ लागले. सततच्या भांडणांना कंटाळून नम्रता मागील दोन महिन्यांपासून पतीचे घर सोडून शाहरुख पठाणसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. मात्र, तिचे सोन्याचे दागिने शैलेंद्रकडेच होते.
२२ जानेवारी रोजी शाहरुख कामावरून घरी परतल्यानंतर नम्रताने त्याला सांगितले की, तिने दागिने परत मिळावेत यासाठी पती शैलेंद्रला फोन केला असून त्याने वाडेबोल्हाई येथे बोलावले आहे. त्यानुसार नम्रता, शाहरुख आणि त्यांचा मित्र हरिष हे तिघेही रात्री साडेनऊच्या सुमारास वाडेबोल्हाई फाटा येथे पोहोचले. शैलेंद्रने नम्रताला जोगेश्वरी शाळेच्या मागील भागात भेटण्यासाठी बोलावले होते. यावेळी शाहरुखला बाहेरच थांबवून नम्रता एकटीच पतीकडे गेली.
थोड्याच वेळात नम्रताच्या किंचाळण्याचा आवाज आल्याने शाहरुख त्या दिशेने धावला. तेव्हा शैलेंद्र आपल्या पत्नीच्या गळ्यावर आणि चेहऱ्यावर चाकूने सपासप वार करत असल्याचे त्याला दिसले. शाहरुखला पाहताच आरोपीने घटनास्थळी असलेले हत्यार आणि स्वतःची दुचाकी तिथेच टाकून पलायन केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नम्रताला तातडीने वाघोली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले.या घटनेनंतर लोणीकंद पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत आरोपी पती शैलेंद्र व्हटकर याला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराज कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या घटनेमुळे वाडेबोल्हाई परिसरात खळबळ उडाली आहे.