रशियातील एमबीबीएस प्रवेशाच्या नावाखाली २३ लाखांची फसवणूक; डोंबिवलीतील ‘स्टडी हब पॅलेस’च्या चार डॉक्टरांविरुद्ध गुन्हा
पोलीस महानगर नेटवर्क
डोंबिवली : रशियातील ओरेनबर्ग स्टेट मेडिकल विद्यापीठात एमबीबीएस शिक्षणासाठी प्रवेश मिळवून देतो, असे आमिष दाखवून एका विद्यार्थ्याच्या कुटुंबाकडून तब्बल २३ लाख ८ हजार ६१७ रुपये उकळल्याप्रकरणी डोंबिवलीतील स्टडी हब पॅलेस या संस्थेच्या चार संचालक डॉक्टरांविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी संदेश विलास फडतरे (रा. डोंबिवली पूर्व) यांनी तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, एमबीबीएस प्रवेश प्रक्रियेसाठी गोळा करण्यात आलेल्या रकमेपैकी ७ लाख ६९ हजार ५३८ रुपये इतकी रक्कम रशियातील संबंधित विद्यापीठात भरल्याचे सांगण्यात आले; मात्र उर्वरित १५ लाख ३९ हजार रुपये विद्यापीठाकडे न भरता संस्थेच्या संचालकांनी स्वतःकडेच ठेवल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यामुळे आपल्या मुलाच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळ करून फसवणूक केल्याचा आरोप फडतरे यांनी केला आहे.
तक्रारीच्या आधारे पोलिसांनी स्टडी हब पॅलेसचे संचालक डॉ. आशीष पत्रा, डॉ. शुभम, डॉ. राकेश सिंग आणि डॉ. मयांक राज यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ४२० (फसवणूक), ४०६ (विश्वासघात) आणि ३४ अन्वये सोमवारी गुन्हा दाखल केला आहे. सप्टेंबर २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत हा कथित फसवणुकीचा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास रामनगर पोलीस करत असून, परदेशातील वैद्यकीय शिक्षणाच्या नावाखाली होणाऱ्या अशा फसवणूक प्रकरणांबाबत पालकांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.