यवतमाळ जिल्ह्यात नकली नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; दोघांना अटक तर एक जण फरार
योगेश पांडे / वार्ताहर
यवतमाळ – यवतमाळ जिल्ह्यातील बोरी खुर्दमध्ये ५०० रुपयांच्या नकली नोटा छापणाऱ्यांचा पर्दाफाश करण्यात आला आहे. पोलिसांनी धाड टाकत ही सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून एक जण फरार झाला आहे. या धक्कादायक प्रकाराने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार यवतमाळ जिल्ह्यातील बोरी खुर्द येथील एका घरात ५०० रुपयांच्या नकली नोटा प्रिंट करून छापल्या जात असल्याची गुप्त माहिती पुसद शहर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ बोरी खुर्द येथे अचानक धाड टाकत मोठी कारवाई केली. या छाप्यात नकली नोटा छापण्यासाठी वापरण्यात येणारे सर्व साहित्य जप्त करण्यात आले असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर एक आरोपी फरार आहे.
हिंगोली येथील संतोष सूर्यवंशी आणि पुसद येथील गणेश गायकवाड हे यवतमाळ जिल्ह्यातील विनोद केरबाजी कुरडे यांच्या घरी प्रिंटरच्या साहाय्याने ५०० रुपयांच्या नकली नोटा छापत होते. आतापर्यंत सुमारे १५ नकली नोटा छापण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. गुप्त माहितीच्या आधारे उपविभागीय पोलिस अधिकारी हर्षवर्धन बिजे यांच्या मार्गदर्शनाखाली व ठाणेदार सेवानंद वानखेडे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.
दरम्यान, या छाप्यात पोलिसांनी ५०० रुपयांच्या ४ ओरिजनल नोटा व १५ नकली नोटा जप्त केल्या. यासह प्रिंटर, केमिकल, कोरे कागद, कटर, पॅड आदी साहित्यही ताब्यात घेण्यात आले. फरार आरोपी विनोद केरबाजी कुरडे याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.