कल्याण-डोंबिवलीत भाजप अन् शिवसेनेकडून नगरसेवक फोडण्याचे प्रयत्न; ठाकरे गटाचे नऊ जण अज्ञातस्थळी
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण – कल्याण डोंबिवली महापालिकेवर सत्ता स्थापनेसाठी फोडाफोडीचे राजकारण सुरू झाल्याचं चित्र दिसून येत आहे. शिवसेना भाजपकडून नगरसेवक फोडण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेवर सत्ता स्थापनेसाठी शिवसेना-भाजपकडून ठाकरेगट आणि मनसे यांचे निवडून आलेले नगरसेवक फोडण्याचे प्रयत्न सुरु असल्याने शिवसेना ठाकरे गटाचे नऊ नगरसेवक अज्ञात स्थळी गेले असल्याची माहिती समोर आली आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप शिवसेनेचा प्रयत्न असल्याने अज्ञात स्थळी असल्याचे एका पती नगरसेवकाने फोन द्वारे माहिती दिली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेवर सत्ता स्थापन करायची असेल तर ६२ हा बहुमताचा आकडा गाठणे महत्त्वाचे आहे. सध्या शिंदे यांच्या शिवसेनेकडे ५३ नगरसेवक आहेत. तर भाजपाकडे ५० नगरसेवक आहेत. ठाकरे गटाचे ११ तर मनसेचे ५ नगरसेवक आहेत. आता ठाकरे गटाचे दोन नगरसेवक अज्ञात ठिकाणी आहेत. ते शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये शिवसेना शिंदे गटाने ५३ तर भाजपाने ५० जागा जिंकल्या आहेत. यामुळे केडीएमसी मध्ये मोठा भाऊ नेमका आता कोण हे ठरवण्यासाठी दोन्ही पक्षाने इतर पक्षांनी ठाकरे आणि मनसेंच्या निवडूण आलेल्या नगरसेवकांना गळाला लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. संख्याबळाच्या दृष्टीने दोन्ही पक्ष महायुतीत असले, तरीदेखील नेतृत्वाच्या मुद्द्यावरून युतीतील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावरती येण्याची शक्यता बळावली आहे. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाने देखील ११ जागा व मनसेने ५ जागा निवडून आणत दोन्ही पक्षाची कोंडी करून ठेवली आहे. काँग्रेसकडे २ तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे १ जागा आली आहे. आता हे पक्ष कोणाला साथ देतात कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये कोणाची सत्ता स्थापन होते हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.