तळोजा मध्यवर्ती कारागृह परिसरात बिबट्याचा वावर; अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये भीती

नवी मुंबई : तळोजा मध्यवर्ती कारागृहाच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यासह इतर वन्य प्राण्यांचा वाढता वावर प्रशासनासाठी गंभीर सुरक्षेचा प्रश्न ठरत आहे. ११ जानेवारी रोजी बिबट्याने थेट कारागृह वसाहतीत शिरकाव केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कारागृहाच्या मागील बाजूस डोंगराच्या पायथ्याशी अधीक्षकांचा बंगला असून, परिसरात दाट झाडी आणि ओसाड वसाहती आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरल्याने येथील कर्मचारी वसाहती पूर्वीच रिक्त करण्यात आल्या आहेत. परिणामी मानवी वर्दळ कमी झाल्याने अजगर, घोणस, मण्यार यांसारखे विषारी साप, रानडुक्कर, तरस यांच्यासह आता बिबट्याचाही वावर वाढल्याचे दिसून येत आहे. खारघर-पांडवकडा परिसरात बिबट्याच्या हालचाली आधीच नोंदवण्यात आल्या होत्या; मात्र तो थेट कारागृह परिसरात पोहोचल्याने चिंतेत भर पडली आहे.
रात्रीच्या वेळी धोका वाढला
कारागृह अधीक्षकांचा बंगला वगळता आसपास निवासी वस्ती नसल्याने रात्री कर्तव्यावर येणाऱ्या-जाणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अंधारात गस्त घालणाऱ्या रक्षकांना अधिक सतर्क राहावे लागत आहे.
वन विभागाची हालचाल
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कारागृह प्रशासनाने पनवेल वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. बिबट्याला पकडण्यासाठी लोखंडी पिंजरा लावण्याची लेखी मागणी करण्यात आली असून, वन विभागाने परिसराची पाहणी केली आहे. बिबट्याच्या हालचाली टिपण्यासाठी ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले असून त्याद्वारे सतत निरीक्षण सुरू आहे.
खबरदारीचे आवाहन
बिबट्या जेरबंद होईपर्यंत परिसरात वावरणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कारागृह प्रशासनाने केले आहे. वन विभाग व कारागृह प्रशासन संयुक्तपणे परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. शहराच्या जवळच वन्यजीव व मानवी वस्ती यांच्यातील संघर्षाचे हे आणखी एक उदाहरण मानले जात आहे.