मुंबई-ठाण्यातील मराठीपण पुसण्याचा डाव भाजपचा आहे, त्यामुळे आपल्यासाठी पहिला स्वाभिमान महत्त्वाचा – राज ठाकरे
ठाण्यात भाजप कडून ऑफर केलेल्या कल्याण-डोंबिवलीतील उमेदवारांना समोर आणत राज ठाकरेंचा भाजपवर घाणाघात
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपची माणसं पैसे वाटतात आणि त्यांना शिंदेंची माणसं पकडून मारतात, ही अशी अवस्था आपण पाहतोय. यांनी जर विकास केला असला तर त्यांना मताला पाच पाच हजार का द्यावं लागतंय असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला. तसेच कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपने ठाकरेंच्या उमेदवारांना माघार घेण्यासाठी पाच पाच कोटींची ऑफर दिल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. असं असतानाही न विकले जाता आमचे उमेदवार लढत आहेत असं म्हणत राज ठाकरेंनी ते सगळे उमेदवार लोकांच्या समोर आणले.
ठाण्यात ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी राज ठाकरेंनी त्यांच्या पक्षाच्या काही उमेदवारांना समोर आणलं. भाजपकडून मताला पाच हजार दिले जात आहे. मला देणाऱ्यांची चिंता नाही तर घेणाऱ्यांची चिंता आहे. उद्या यांची मुलं काय म्हणतील, आमचे आई-वडील पाच पाच हजारांना विकले गेले असं राज ठाकरे म्हणाले.
कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये झालेल्या बिनविरोध निवडीवर राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली. राज ठाकरे म्हणाले की, पूर्वी जसा गुलामांचा बाजार मांडला गेला तसा बाजार आता कल्याण डोंबिवलीमध्ये मांडला गेला. एकेका उमेदवाराला पाच पाच कोटी रुपये ऑफर देण्यात आली.
राज ठाकरे म्हणाले की, “आपल्या पक्षाचे शैलेश धात्रक, मनिषा धात्रक आणि पूजा धात्रक हे एकाच कुटुंबातील तिघेजण निवडणुकीला उभारले आहेत. त्यांना प्रत्येकी पाच कोटी अशी १५ कोटींची ऑफर देण्यात आली होती. तरीही १५ कोटींची ऑफर नाकारून ते तिघेही निवडणुकीला उभे राहिले. दुसरे उमेदवार, राजश्री नाईक… त्यांना पाच कोटींची ऑफर देण्यात आली. सुशील आवटे यांना एक कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली, ती त्यांनी नाकारली. हे सगळे निवडणुकीला उभे राहिले आहेत.”
कुठून येतो हा पैसा, काय चाललंय? हे फक्त दोन तीन जण समोर आले आहेत, यांना देण्यासाठीचे पैसे कुठुन येताहेत? इतकी वर्षे आम्ही निवडणूक पाहतोय, अशी निवडणूक पाहिली नाही असं राज ठाकरे म्हणाले.
एका उद्योगपतीला ठाण्यातील एक हजार कोटींची जमीन द्यायचा घाट एकनाथ शिंदे यांनी घातला होता. ती जमीन वनखात्याची होती, त्यामुळे गणेश नाईकांनी त्यांचा डाव हाणून पाडल्याचं राज ठाकरे म्हणाले.राज ठाकरे यांनी मुंबई विमानतळावरचा गरब्याचं आयोजनाचा एक व्हिडीओ दाखवला. ते म्हणाले की, अदानींनी मुंबई विमानतळ हातात घेतल्यानंतर त्या ठिकाणी गरबा आयोजित केला होता. कधी गणेशोत्सवाला ढोल ताशा वाजवला होता का? लेझीम खेळला होतात? असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला.
ठाण्याचा विकास तर करूच, पण आधी आपला स्वाभिमान महत्त्वाचा. ठाणे-मुंबईतील मराठीपण पुसून काढलं जातंय. घरातील कपाट दुरुस्त करायला येताय आणि बायकांवर नजर ठेवताय… हे चालणार नाही असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.