देशी बनावटीचा गावठी कट्टा व जिवंत काडतुसे जप्त; पाहिजे आरोपी शफिक सैय्यद बाजारपेठ पोलिसांच्या तावडीत
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण : बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने शिताफीने कारवाई करत देशी बनावटीचा गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या पाहिजे आरोपीस अटक केली आहे. ही कारवाई ७ जानेवारी २०२६ रोजी कल्याण पश्चिम परिसरात करण्यात आली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आंधळे यांना खास बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, बाजारपेठ पोलीस ठाण्यातील गुन्हा नोंद क्रमांक ६४/२०२४ (भादंवि कलम ३९९, ४०२ तसेच शस्त्र अधिनियम) मधील पाहिजे आरोपी शफिक गफूर सैय्यद उर्फ बगला हा दुर्गामाता मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या लोखंडी पुलाखाली कारमधून फिरत असून त्याच्याकडे अग्निशस्त्र आहे. ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौड यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला.
पोलिसांनी कारवाई करत शफिक गफूर सैय्यद (वय २८, व्यवसाय ड्रायव्हर, रा. कोनगाव, भिवंडी) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक देशी बनावटीचा लोखंडी गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे आणि स्कोडा कंपनीची कार जप्त करण्यात आली. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे २ लाख ४० हजार ८०० रुपये इतकी आहे.
या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक १०/२०२६ अंतर्गत भारतीय हत्यार कायदा तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, अपर पोलीस आयुक्त संजय जाधव, पोलीस उप आयुक्त अतुल झेंडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.