खार पूर्वेत ९ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार; आरोपीस २० वर्षे सश्रम कारावास
सुधाकर नाडार / मुंबई

मुंबई : खार पूर्व येथील हुसैन टेकडी परिसरात ९ वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार केल्याच्या गंभीर गुन्ह्यात विशेष सत्र न्यायालयाने आरोपी मनुवर गेणू मलिक (वय ५२) याला २० वर्षे सश्रम कारावास व ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास दोन महिन्यांची अतिरिक्त शिक्षा भोगावी लागणार आहे.
निर्मलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवालीक कंपाउंड झोपडपट्टीत १८ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली होती. फिर्यादी महिलेची ९ वर्षीय मुलगी घराबाहेर मैत्रिणींसोबत खेळत असताना शेजारी राहणाऱ्या आरोपीच्या घरात गेली. तिच्या सोबतच्या मैत्रिणी घरात लपल्या असताना मुलगी एकटी असल्याचे लक्षात येताच आरोपीने घराला आतून कडी लावून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर घाबरलेली मुलगी घरी परत आली. आईने विचारपूस केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
यानंतर पीडित मुलीच्या आईने निर्मलनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा क्रमांक ११९६/२०२२ नुसार भादंवि कलम ३७६, ३५४, ३४१ तसेच बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम २०१२ अंतर्गत कलम ४, ८ व १२ अन्वये आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास अधिकारी पोलीस निरीक्षक एस. टी. चव्हाण यांनी १९ डिसेंबर २०२२ रोजी आरोपीस अटक केली. अटकेपासून आरोपी न्यायालयीन कोठडीत होता.
सदर गुन्हयाच्या अनुषंगाने गुन्हयातील बळित बालिकेबरोबर खेळण्यास सदर ठिकाणी गेलेली तिची मैत्रीण तसेच इतर साक्षीदार यांचेकडे सखोल तपास करून त्यांचे जबाब नोंदवून गुन्हयाच्या तपासामध्ये सबळ पुरावा प्राप्त करून पो.नि. एस.टी. चव्हाण यांनी आरोपीविरूध्द मा, न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. त्याचा स्पेशल केस क्रमांक २१८/२०२३ असा होता.
सदर केसची सुनावणी मा. अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती बी. एस. गरे, कोर्ट क्रमांक ६०, विशेष सत्र न्यायालय, मुंबई यांचे न्यायालयात दिनांक ०६/०१/२०२६ रोजी झाली. गुन्हयातील फिर्यादी, बळित बालिका तसेच सदर घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार बालिका इतर साक्षीदार व तपासी अधिकारी यांच्या मा. न्यायालयात साक्ष होवून मा. न्यायालयाने साक्ष ग्राहय धरून मा. विशेष सत्र न्यायालयाने आरोपीस लहान मुलीवरील बलात्काराच्या गुन्हयामध्ये आरोपी नामे मनुवर गेणू मलिक यांस २० वर्षे सश्रम कारावास व रू. ५०००/- दंड व दंड न भरल्यास दोन महिने शिक्षा अशी शिक्षा सुनावली आहे.
सदर गुन्हयाच्या सुनावणीदरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रमेश वाघ, पो.नि. (गुन्हे), युवराज खाडे हे केसच्या सुनावणीवर सतत लक्ष ठेवून होते. व त्याअनुषंगाने कोर्ट पैरवी अधिकारी व कोर्ट कारकून यांना केसच्या अनुषंगाने वेळोवेळी सूचना देवून मार्गदर्शन करीत होते.