चेंबूर प्रभाग १५० : काँग्रेसच्या वैशाली शेंडकर यांना जनतेचा वाढता पाठिंबा
रवि निषाद / मुंबई
मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होत असून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने चेंबूर विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १५० मधून श्रीमती वैशाली अजित शेंडकर यांना उमेदवारी दिली आहे. ‘हाताचा पंजा’ हे त्यांचे निवडणूक चिन्ह असून प्रचाराच्या सुरुवातीपासूनच त्यांना स्थानिक जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
प्रभाग क्रमांक १५० मध्ये दलित, मुस्लिम तसेच आंबेडकरी समाजाची लोकसंख्या लक्षणीय असल्याने या मतदारांचा कल कोणाकडे राहतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. वैशाली शेंडकर यांच्या उमेदवारीमुळे या प्रभागातील निवडणूक समीकरण अधिक गतिमान झाले असल्याचे चित्र दिसून येत आहे.
नागवाडी, कादरिया नगर, माळेकरवाडी, गुलशन बाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, नूरानी बाग, जुनी नागवाडी, पंजाबी चाळ, फुले नगर आदी परिसरात शेंडकर यांच्या प्रचाराची चर्चा आहे. स्थानिक प्रश्न, नागरी सुविधा आणि सर्वसमावेशक विकासाच्या मुद्द्यांवर त्यांनी प्रचाराला सुरुवात केल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे.
सुमारे तीन दशकांपासून हा प्रभाग काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. येथून काँग्रेसचे माजी मंत्री व खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या कुटुंबाने सातत्याने विजय मिळविला आहे. या पार्श्वभूमीवर यंदाही काँग्रेसच्या उमेदवाराच्या विजयाबाबत पक्ष कार्यकर्त्यांमध्ये आशावाद दिसून येत आहे.
प्रभागात मुस्लिम मतदारांची संख्या अंदाजे २० ते २५ टक्के असून दलित व आंबेडकरी समाजातील मतदारांचीही मोठी संख्या आहे. या घटकांचा कल निवडणूक निकालावर निर्णायक ठरू शकतो, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. निवडणूक जवळ येत असताना प्रभाग १५० मधील प्रचाराची धग आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.