ऑनलाईन फसवणूक टोळीचा पर्दाफाश; गुन्हे प्रकटीकरण शाखेची मोठी कारवाई

Spread the love

ऑनलाईन फसवणूक टोळीचा पर्दाफाश; गुन्हे प्रकटीकरण शाखेची मोठी कारवाई

पोलीस महानगर नेटवर्क

भाईंदर : मॅट्रीमोनिअल साईट्स तसेच विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून नागरिकांशी संपर्क साधून विश्वास संपादन करत ऑनलाईन फॉरेक्स व गोल्ड ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष–४ ने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली असून देशभरातील तब्बल ५१ गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचे तपासात उघड झाले आहे.

१२ नोव्हेंबर २०२५ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुंबई–अहमदाबाद महामार्गावरील शिवसाई रेसिडेन्सी लॉजिंग अ‍ॅण्ड बोर्डिंग येथे छापा टाकण्यात आला. या कारवाईत रोशनकुमार सिथारामा शेट्टी, साबिर मोहम्मद खान, सनद संजीव दास, राहुलकुमार ऊर्फ कैलाश राकेशकुमार आणि आमिर करम शेर खान यांना ताब्यात घेण्यात आले. हे आरोपी ऑनलाईन फसवणुकीतून मिळालेले पैसे विविध बँक खात्यांत स्वीकारत असल्याचे आढळून आले.

तपासात असे निष्पन्न झाले की, आरोपी मॅट्रीमोनिअल साईट्स व सोशल मीडियावरून नागरिकांशी मैत्री करून विश्वास संपादन करत. त्यानंतर बनावट वेबसाईट्सच्या लिंक्स पाठवून फॉरेक्स व गोल्ड ट्रेडिंगमधून मोठा नफा मिळेल, असे भासवून वेगवेगळ्या बँक खात्यांत पैसे भरण्यास भाग पाडले जात होते. या पद्धतीने देशभरातील अनेक नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्यात आली.

गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने वरिष्ठांच्या आदेशानुसार तपास गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष–४ कडे वर्ग करण्यात आला. पुढील तपासात अभिषेक अनिल नारकर ऊर्फ गोपाळ आणि मोहम्मद रशिद फकीर मोहम्मद बलोच ऊर्फ लक्की यांनाही अटक करण्यात आली. आरोपींच्या बँक खात्यांच्या तपासातून महाराष्ट्रासह मुंबई, नवी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, जळगाव, धुळे तसेच मध्यप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा आणि पश्चिम बंगालमधील विविध सायबर पोलीस ठाण्यांत दाखल असलेले एकूण ५१ गुन्हे उघडकीस आले आहेत.

आतापर्यंतच्या तपासात देशभरातील सामान्य नागरिकांची २०० कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याचे समोर आले असून या रॅकेटचा मुख्य सूत्रधार भारताबाहेरून कामकाज करत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. अटक आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उप आयुक्त संदीप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष–४चे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख आणि त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon