सायबर चोरट्यांकडून सव्वाकोटींची फसवणूक; शेअर बाजार, ऑनलाइन टास्कचे आमिष
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे : सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांना विविध आमिषे दाखवून आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. शेअर बाजारात गुंतवणुकीचा बनावट परतावा, घरबसल्या ऑनलाइन काम (ऑनलाइन टास्क) अशा आमिषांद्वारे सायबर चोरट्यांनी शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये सव्वाकोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.
शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून एका महिलेची तब्बल ३१ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना शिवाजीनगर परिसरात घडली. याप्रकरणी संबंधित महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तक्रारदार महिला शिवाजीनगर भागात वास्तव्यास आहेत.
नोव्हेंबर महिन्यात सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधत शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल, असे भासविले. विश्वास संपादन करण्यासाठी सुरुवातीला त्यांनी गुंतवलेल्या रकमेवर परतावा मिळाल्याचे दाखवण्यात आले. त्यामुळे विश्वास बसल्यानंतर महिलेने वेळोवेळी चोरट्यांनी दिलेल्या बँक खात्यांमध्ये रक्कम जमा केली.
दोन महिन्यांच्या कालावधीत महिलेने एकूण ३१ लाख रुपये जमा केले. मात्र, त्यानंतर परतावा मिळणे बंद झाले आणि फसवणूक झाल्याचे लक्षात आले. अखेर महिलेने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.
या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक धनंजय पिंगळे करत आहेत. दरम्यान, नागरिकांनी सोशल मीडियावरील, तसेच अनोळखी क्रमांकांवरून येणाऱ्या गुंतवणूक व ऑनलाइन कामाच्या आमिषांना बळी न पडण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.