मुंबईतील प्रभाग १६९ नेहरू नगरमध्ये वंचितविरोधात काँग्रेससमर्थित हालचाली

Spread the love

मुंबईतील प्रभाग १६९ नेहरू नगरमध्ये वंचितविरोधात काँग्रेससमर्थित हालचाली

रवि निषाद / मुंबई

मुंबई : काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात झालेल्या युतीनुसार प्रभाग क्रमांक १६९ नेहरू नगर हा मतदारसंघ वंचित बहुजन आघाडीच्या वाट्याला आला असून, या प्रभागातून वंचितचे कुर्ला विधानसभा क्षेत्राध्यक्ष स्वप्निल जवळगेकर हे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

मात्र, या युतीच्या पार्श्वभूमीवर नेहरू नगर प्रभागात काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणाची छटा स्पष्टपणे दिसून येत आहे. युती होण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले प्रमोद (आप्पा) पाटील हे आता काँग्रेसचे मित्र पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट)च्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत.

प्रमोद पाटील यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर नेहरू नगर परिसरात पक्षसंघटनेला बळ मिळाल्याचे चित्र होते. प्रशासनातील चांगला अनुभव, विकासकामांचा ठसा आणि दांडगा जनसंपर्क यामुळे काँग्रेसला या मतदारसंघात नवसंजीवनी मिळाल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. मात्र, युतीअंतर्गत हा प्रभाग काँग्रेसच्या वाट्याला न आल्याने पक्षाच्या स्थानिक नेत्यांमध्ये असंतोष निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

या पार्श्वभूमीवर प्रमोद पाटील यांची स्वतंत्र उमेदवारी ही वंचित बहुजन आघाडीसमोरील आव्हान ठरू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. काँग्रेसच्या अंतर्गत बंडखोरीचा फटका वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, या मतदारसंघातील निवडणूक आता अधिक चुरशीची ठरण्याची चिन्हे आहेत.

नेहरू नगर प्रभागातील ही राजकीय घडामोड युतीधर्म टिकतो की स्थानिक समीकरणे वरचढ ठरतात, याचा निर्णय देणारी ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon