पनवेल पोलिसांची विशेष मोहीम यशस्वी; CEIR पोर्टलच्या मदतीने १०३ हरवलेले मोबाईल परत
पनवेल : हरवलेले किंवा चोरीला गेलेले मोबाईल शोधणे अनेकांसाठी डोकेदुखी ठरत असताना पनवेल शहर पोलिसांनी तांत्रिक साधनांचा प्रभावी वापर करत तब्बल १०३ मोबाईल फोन शोधून काढत त्यांचे मूळ मालकांना परत केले. या मोबाईल्सची एकूण किंमत अंदाजे ₹१५ लाख ४५ हजार इतकी असल्याचे सांगण्यात आले.
केंद्र सरकारच्या सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर (CEIR) पोर्टलच्या मदतीने ही मोहीम राबवण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण फडतरे, पोलीस शिपाई विशाल दुधे, सचिन कोर यांच्यासह पथकाने हरवलेल्या मोबाईल्सचे तांत्रिक विश्लेषण करून वेगवेगळ्या ठिकाणी सापडलेले फोन हस्तगत केले. यातील काही फोन महाराष्ट्राबाहेरील राज्यांत वापरात असल्याचे आढळून आले. मात्र स्थानिक पोलिसांच्या मदतीने ते शोधून काढण्यात यश आले.
पनवेल विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांच्या उपस्थितीत मोबाईल फोन संबंधित नागरिकांना सुपूर्द करण्यात आले. हरवलेला फोन पुन्हा मिळाल्याने नागरिकांनी दिलासा व्यक्त करत पोलिसांचे कौतुक केले. “फोन मिळणे म्हणजे हरवलेली सोय परत मिळाल्यासारखे आहे,” असे एका नागरिकाने भावना व्यक्त केल्या.
पोलिसांनी नागरिकांना हरवलेल्या मोबाईलबाबत त्वरित CEIR पोर्टलवर तक्रार नोंदवण्याचे आणि पोलीस ठाण्यात फिर्याद देण्याचे आवाहन केले आहे. वेळेवर तक्रार केल्यास शोध घेणे अधिक सोपे होते, असेही त्यांनी नमूद केले.
पनवेल पोलिसांची ही कार्यवाही नागरिकांच्या सुरक्षेविषयीचा विश्वास वाढवणारी ठरल्याचे निरीक्षकांनी सांगितले. अशा मोहिमा पुढेही चालू राहतील, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.