मालाडसह मुंबईत मोपेड चोरी करणारा युवक अटकेत; ५ एक्टिव्हा जप्त, ४ गुन्ह्यांचा उलगडा

Spread the love

मालाडसह मुंबईत मोपेड चोरी करणारा युवक अटकेत; ५ एक्टिव्हा जप्त, ४ गुन्ह्यांचा उलगडा

सुधाकर नाडार / मुंबई

मुंबई : मालाड तसेच मुंबईतील विविध भागांतून मोपेड चोरी करणाऱ्या एका तरुणाला मालाड पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून पाच होंडा एक्टिव्हा जप्त करण्यात आल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या मोपेड चोरीच्या घटनांमागे हा एकच आरोपी असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या कारवाईमुळे चार गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले.

२० डिसेंबर २०२५ रोजी मालाड (प.) येथील क्लाऊड नाईन हॉस्पिटलसमोरील गल्लीतून होंडा एक्टिव्हा चोरीची घटना घडली. फिर्यादीच्या तक्रारीनंतर मालाड पोलीस ठाण्यात गु.र.क्र. ९२९/२०२५, कलम ३०३(२) भा.न्या.सं. २०२३ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. तपासादरम्यान गुन्हे प्रकटीकरण पथकाने परिसरातील ४० ते ५० सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. याचबरोबर मालाड, जोगेश्वरी व विनोबा भावे नगरातील एक्टिव्हा चोरीच्या काही प्रकरणांचे फुटेज मिळवून त्यांचे विश्लेषण करण्यात आले. सर्व घटनांमध्ये एकाच व्यक्तीचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.

फुटेजमध्ये आरोपी मालवणीच्या दिशेने जात असल्याचे दिसून आल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक तुषार सुखदेवे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने दोन दिवस सुरू पाळत ठेवली. शेवटी आरोपी आपल्या राहत्या परिसरात दिसताच त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत सुरेंद्र बोम्मा (वय १८ वर्षे ३ महिने, रा. राठोडी गाव, मालवणी) याने मागील सहा महिन्यांत विविध ठिकाणी मोपेड चोरी केल्याची कबुली दिली.

जप्त मालमत्तामध्ये ५ होंडा एक्टिव्हा (प्रत्येकी किंमत सुमारे ₹७०,०००), एकूण किंमत – ₹३.५ लाख

उघडकीस आलेले गुन्हे :
मालाड पोलीस ठाणे – गु.र.क्र. ९२९/२०२५,
विनोबा भावे नगर पोलीस ठाणे – गु.र.क्र. २९३/२०२५
जोगेश्वरी पोलीस ठाणे – गु.र.क्र. ८१५/२०२५, ५०४/२०२५
(सर्व गुन्हे कलम ३०३(२) भा.न्या.सं. २०२३ अंतर्गत)
अटक आरोपीकडून जप्त केलेल्या एक्टिव्हाच्या मूळ मालकांचा शोध सुरू असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

ही कारवाई उत्तर प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त शशि कुमार मीना, पोलीस उपायुक्त परिमंडळ-११ संदीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहायक पोलिस आयुक्त प्रकाश बागल यांच्या निर्देशानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुष्यंत चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संजय बेडवाल, उपनिरीक्षक तुषार सुखदेवे व त्यांच्या पथकाने ही संयुक्त कामगिरी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon