मस्जिद बंदरमध्ये उघडपणे ड्रग्सचा धंदा; ‘रिहाना गँग’वर कारवाई कधी होणार? नागरिकांचा संतप्त सवाल
सुधाकर नाडार / मुंबई

मुंबई : मस्जिद बंदर–दाना बंदर परिसरात अमली पदार्थांचा सर्रास आणि उघडपणे व्यापार सुरू असल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे. नंदलाल जनानी रोड आणि एमबीएस रोड जंक्शन परिसरात पान–बीडी दुकानातून तसेच रस्त्यावरून थेट विक्री केली जात असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या धंद्यामागे रिहाना नावाची महिला आणि तिचे वडील सरदार यांचे कथित नेतृत्व असल्याचा आरोप असून, जाफर, अबीदा आणि अब्दुल करीम यांच्या माध्यमातून पुरवठा होत असल्याचे सांगण्यात येते.
या ठिकाणचे व्हिडिओ, मार्ग व नकाशा उपलब्ध असल्याचा दावा करण्यात आला आहे. पान–बीडी दुकानासह शेजारील खोलीतून व्यवहार सुरू असल्याचे आरोप स्पष्ट आहेत. रिहाना पूर्वाश्रमी कॅन्सरग्रस्त होती, मात्र कारवाईवेळी याच कारणाचा दाखला देत सुटका करून घेते, अशीही चर्चा स्थानिक पातळीवर आहे. याशिवाय रिहाना एका को-ऑपरेटिव्ह बँकेच्या कलेक्शन एजंटकडे रक्कम जमा करत असून तिच्या खात्यात तब्बल ७० लाख असल्याचा दावा तिच्या निकटवर्तीयांकडून येतो. पाच खोल्या व दुकाने असूनही फुटपाथवर निवास दाखवून ‘गरीबीचा आव’ धरण्याचा आरोपही होत आहे.
डिसेंबर २५ ते २८ दरम्यान पोलिस महानगर स्पाय टीमने या परिसरातील ड्रग्स व्यापाराचे अनेक व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचे सांगितले जाते. २८ डिसेंबर रोजी प्रत्यक्ष संवादादरम्यान रिहानाने मस्जिद बंदर व पायधोनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुमारे १० ड्रग्स माफिया सक्रिय असल्याचे नावांसह सांगितल्याचा दावा आहे. तिने गांजाचा घाऊक माल कोण देतो तसेच गोवंडी, चेंबूर, कुर्ला आणि किंग सर्कल परिसरात कोण पुरवठा करतो याची माहितीही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाल्याचे सांगण्यात येते. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, रिहाना १० किलो गांजा तोलून पॅक करतानाचा व्हिडिओ टीमला मिळाल्याचा दावा, ज्यामुळे प्रश्न अधिक तीव्रतेने पुढे येत आहे.
दरम्यान पायधोनी पोलिसांनी अलीकडे पोलीस उपायुक्त विजयकांत सागर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद गवकर आणि पोलीस निरीक्षक अभिजीत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ३२६ ग्रॅम हेरॉईनसह तिघांना अटक केली होती. पुढील चौकशीत ६ पुरुष व ३ महिलांकडून ९ किलो हेरॉईन, १२ मोबाईल फोन, एक कार आणि ८.५० लाख रुपये रोख असा एकूण ३७ कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कामगिरीला माध्यमांतून दादही मिळाली.
मात्र, त्याच पायधोनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याचे सांगण्यात येणाऱ्या रिहाना, सरदार, अबीदा, जाफर आणि अब्दुल करीम यांच्यावर कारवाई का होत नाही? हा प्रश्न आता अधिक ठळकपणे पुढे येत आहे.
राज्यात गुटखा व ड्रग्स विरोधात सरकारचा कडक पवित्रा असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुटखा विक्रेत्यांवर मोक्का लागू करण्याचे संकेत दिले आहेत. मुंबई पोलीस आयुक्त देवन भारती यांच्या आदेशानंतर ड्रग्स माफियांविरोधातही कठोर कायदे लागू करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मात्र मस्जिद बंदर प्रकरणात अद्याप कोणतीही निर्णायक कारवाई न झाल्याने स्थानिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून “व्हिडिओ, पुरावे, हाडाच्या जवळचा व्यवहार मग कारवाई थांबते कुठे?” असा सवाल जनतेकडून सरळपणे उभा राहतो.