बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घाटकोपर पूर्वेत झोपडीबांधणीचा मुद्दा ऐरणीवर; स्थानिकांकडून ‘झोपडीमाफिया सक्रिय’ असल्याचा आरोप
रवि निषाद / मुंबई
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीची रणधूमाळी सुरु असतानाच घाटकोपर पूर्व येथील रमाबाई अंबेडकर नगरातील प्रियदर्शनी सेवा संघ झोपडपट्टी परिसरात झोपड्यांची बेकायदेशीर उभारणी सुरु असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. खाडी परिसरात रात्रीच्या वेळी भरणी करून नवनिर्मित झोपड्या विक्रीस काढल्या जात असल्याचा स्थानिकांनी आरोप केला आहे. या घडामोडीत काही राजकीय पाठबळ असल्याचाही सूचक आरोप रहिवाशांनी केला.
स्थानिकांच्या मते, खाडीलगत भरणी टाकून झोपड्या उभारण्याचा प्रकार गेल्या काही दिवसांत वाढला असून झोपड्या बांधून त्यांची खरेदी-विक्री सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. “काही व्यक्तींना राजकीय संरक्षण मिळत असल्याने कारवाई टाळली जाते,” असा आरोप काही समाजकार्यकर्त्यांनी केला. दोन दिवसांपूर्वी झोपडाबांधणीच्या वादातून मारहाणीची घटना घडल्याची माहितीही मिळते.
परिसरातील काही दुकानदारांनी सांगितले की, रात्री झोपड्या उभ्या करून दिवसाढवळ्या त्यांची विक्री केली जाते, त्यामुळे परिसरातील तणाव वाढला असून निवडणूक काळात कारवाई टाळली जात असल्याचीही चर्चा आहे. मनपाचे संबंधित अधिकारी या संदर्भात मौन बाळगत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
“खाडी परिसराचा अनधिकृत वापर थांबवून तातडीने कारवाई करावी,” अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. बेकायदेशीर झोपड्यांबाबत मनपा व पोलिस प्रशासनाने त्वरित दखल घेण्याची गरज असल्याचा सूर नागरिकांमध्ये दिसत आहे.