बारामतीत मटन दुकानदाराचे अपहरण; ‘लाईनमध्ये थांब’ सांगितल्याचा राग, कोयता–बेल्टने बेदम मारहाण
बारामती : ‘रांगेत थांबावे’ सांगितल्याचा राग मनात धरत मटन दुकानदाराचे अपहरण करून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना बारामती तालुक्यात उघडकीस आली आहे. ‘गुगलवर माझं नाव शोध, मी मोठा ऑफिसर आहे’ अशी दादागिरी दाखवणाऱ्या इसमाने सहकाऱ्यांच्या मदतीने दुकानदाराला जबरदस्ती कारमध्ये बसवून जीव घेण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद बारामती तालुका पोलिसांत दाखल आहे. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून इतरांचा शोध सुरू आहे.
ज्ञानेश्वर भारत आटोळे (२७, रा. सावळ, ता. बारामती) हे ‘जय भवानी मटन शॉप’ चालवत आहेत. २१ डिसेंबर रोजी सुर्यनगरी येथे मटन खरेदीच्या वेळी एका इसमाने लाईनमध्ये उभे राहण्यास नकार देत दमदाटी केली. दुकानात वाद वाढल्याने त्याने वजनाचा काटा उचलून मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तो ऑनलाईन पेमेंट करून निघून गेला. पेमेंटवरून त्याचे नाव ‘स्वागत हनुमंत सोरटे’ असल्याचे आटोळेंच्या लक्षात आले.
घटनेनंतर चार दिवसांनी २५ डिसेंबर रोजी संध्याकाळी आटोळे हे दुकानाबाहेर असताना स्विफ्ट आणि क्रेटा अशा दोन गाड्यांनी आलेल्या पाच जणांनी त्यांना जबरदस्ती कारमध्ये बसवून जळोची परिसरात नेले. यावेळी व्हिडीओ कॉलवरून पूर्वी वाद घातलेल्या इसमाने ‘मी सांगितले तसेच करा, किती दम आहे पाहू’ असे म्हणत मारहाणीचे आदेश दिल्याचा आरोप फिर्यादीत नमूद आहे. आरोपींनी कोयत्याच्या मुठीने, बेल्टने तसेच हातांनी बेदम मारहाण केली. ‘जिवंत सोडणार नाही’ अशी धमकीही देण्यात आली. पोलिस आणि नातेवाईक वेळेवर पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला.
या प्रकरणी ऋषी गावडे याला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. तपासात संकेत मुसळे आणि शितल बेंगारे हेही सहभागी असल्याचे समोर आले असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांचे पथक कार्यरत आहे.
दरम्यान, लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याच्या अन्य प्रकरणात श्रीराज अविनाश चव्हाण (रा. बारामती) यासही पोलिसांनी अटक केली आहे. दोन्ही कारवाया पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या पथकाने केल्या.