बटोगे तो पिटोगे’! उत्तर भारतीय सेनेचे सुनील शुक्लाच्या थेट शिवसेना भवनाजवळ पोस्टर लावल्याने दादरमध्ये रंगले पोस्टर वॉर, मनसे आक्रमक
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबईसह राज्यात मराठीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले असतानाच उत्तर भारतीय सेनेतर्फे शनिवारी शिवसेना भवन येथे लावण्यात आलेल्या पोस्टरवरून परिसरात तणाव पसरला आहे. ‘उत्तर भारतीय सटोगे तो बचोगे, वरना बटोगे तो पिटोगे’, अशा आशयाचे पोस्टर सेना भवन परिसरात लावण्यात आले असून यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा धारण केला आहे.
मराठीचा अपमान कराल तो नहीं बटोगे तो भी पिटोगे’, अशी प्रतिक्रिया मनसेचे संदीप देशपांडे यांनी शनिवारी दिली. त्यामुळे या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय वाद पेटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री गोविंद पंत हे मराठी असू शकतात, तर मुंबईचे महापौर उत्तर भारतीय का असू शकत नाहीत, असा प्रश्न शुक्ला यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये उत्तर भारतीयांना मारहाण होत आहे. सध्या मनसेची उत्तर भारतीयांविरुद्ध नेट प्रॅक्टिस सुरू आहे, जर मनसे सत्तेत आली तर सीझन क्रिकेट सुरू होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. शुक्ला यांच्या या पोस्टरवर देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली. मराठीचा अपमान केला तर नहीं बटोगे तो भी पिटोगे, असे ते म्हणाले. हा सर्व प्रकार जाणीवपूर्वक सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.