बहिणीच्या प्रेमप्रकरणाचा भावाला राग; मित्राच्या मदतीने पुण्यात तरुणीच्या प्रियकराची हत्या, दोन्ही आरोपींना अटक
योगेश पांडे / वार्ताहर
नांदेड – बहिणीशी प्रेमसंबध ठेवल्याच्या रागातून भावाने मित्राच्या मदतीने पुण्यात एकाची हत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. तरुणीच्या प्रियकराची हत्या करुन तरुणीचा भाऊ आणि त्याचा मित्र असे दोघे फरार झाले होते. आरोपीचा शोध सुरू असताना तो नांदेड जिल्ह्यात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरुन नांदेड ग्रामीण पोलिसांनी दोन्ही संशयित आरोपींना सापळा रचून अटक केली. संदिप रंगराव भुरके (२८) आणि ओमप्रकाश गणेश किरकण (२४) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. घटनेतील आरोपी आणि मृत हे सर्व नांदेड जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
पुण्याच्या आंबेगाव येथील गुरुदत्त वॉशिंग सेंटरमध्ये काम करणाऱ्या जावेद खाजामियां पठाण याचं संदिप भुरके याच्या बहिणीचे प्रेम संबध होते. बहिणीच्या प्रियकराविषयी भाऊ संदीपच्या मनात राग होता. याचा राग मनात धरुन संदिप भुरके याने मित्र ओमप्रकाश किरकण याच्यासोबत प्लॅन केला. मित्र ओमप्रकाशला सोबत घेऊन संदीपने धारदार शस्त्राने बहिणीच्या प्रियकराची जावेदची हत्या केली. ही घटना पुण्यात २२ डिसेंबर रोजी घडली.
हत्या केल्यानंतर संदीप आण त्याचा मित्र ओमप्रकाश दोघेही फरार झाले. हत्येची माहिती मिळाल्यानंतर पुणे पोलीस दोन्ही आरोपींच्या शोधात त्यांच्या मूळ गावी नांदेड जिल्ह्यातील भोकर येथे आले. पण आरोपी सापडले नव्हते. त्यानंतर हत्या प्रकरणातील संशयित आरोपी संदिप भुरके आणि ओमप्रकाश किरकण हे दोघे नांदेड जवळील वाजेगाव परिसर असल्याची माहिती पोलीसांना मिळाली.
नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर आणि पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मटवाड यांनी दोन्ही आरोपींना वाजेगाव परिसरातून अत्यंत शिताफिने अटक केली. संशयित आरोपी संदिप भुरके आणि मृत जावेद पठाण हे दोघे मुळचे भोकर येथीलच रहिवासी असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती. त्यांचा शोध घेत पुणे पोलीस भोकर येथे आले होते.
दोन्ही आरोपी १५ वर्षांपासून पुण्यातच व्यवसायानिमित्त असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली. ओळखीचा गैरफायदा घेत मृत जावेद पठाण याने संदीप भुरकेच्या बहिणीशी सुत जुळवलं होतं. मात्र संदिप भुरकेचा बहिणीच्या या प्रेमप्रकरणाला विरोध होता. आपली बहीण जावेदसोबत पुण्यात एकत्र राहत असल्याचं भाऊ संदीपला समजलं होतं. याच रागातून जावेद पठाणची पुण्यात हत्या करण्यात आली. त्यानंतर आता पोलिसांनी हत्येच्या घटनेच्या चार दिवसांनी आरोपींना अटक केली आहे.