राष्ट्रीयीकृत बँकमध्ये मोठ्या प्रमाणात क्रेडिट कार्ड घोटाळा; युनियन बँकेच्या तत्कालीन शाखा व्यवस्थापकासह ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Spread the love

राष्ट्रीयीकृत बँकमध्ये मोठ्या प्रमाणात क्रेडिट कार्ड घोटाळा; युनियन बँकेच्या तत्कालीन शाखा व्यवस्थापकासह ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

योगेश पांडे / वार्ताहर

नागपूर – गणेशपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घाट रोडवरील युनियन बँक ऑफ इंडिया येथे क्रेडिट कार्ड व पर्सनल लोनचा १ कोटी ६५ लाख रुपयांचा घोटाळा उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी तत्कालीन शाखा व्यवस्थापक व चार कर्मचाऱ्यांसह सात जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

शाखा व्यवस्थापक नंदेश्वर कृष्णराव मंथापूरकर (६३), विनीत ज्ञानेश्वर रोकडे (४४), प्रशांत जगदीश उके (४०), धीरज गजानन गजभिये (५४), आशिष यशवंत जोगे (३९), दत्ता बैद्यनाथ पांचाल आणि विमल यशवंत जोगे, अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. बँकेचे मुख्य व्यवस्थापक संदीप मोतीलाल कुमार (४०) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, नंदेश्वर मंथापूरकर हे २० डिसेंबर २०१९ ते २३ मे २०२२ या कालावधीत यूनियन बँकेत शाखा व्यवस्थापक, तर विनीत ज्ञानेश्वर रोकडे, प्रशांत जगदीश उके, धीरज गजानन गजभिये तसेच आशिष यशवंत जोगे हे क्रेडिट कार्ड आणि कर्ज विभागात कार्यरत होते. या कालावधीत त्यांनी बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड व अन्य दस्तऐवजांद्वारे ४४ क्रेडिट कार्ड तसेच पांचाल व जोगे यांना एकूण १ कोटी ६५ लाख १७ हजार रुपयांचे वितरण केले.

क्रेडिट कार्ड व कर्ज देताना जोगे याने स्वतःचे बँक खाते नमूद केले. त्याआधारे त्याने पैशांची उचल केली व अन्य साथीदारांना वितरीत केले. दरम्यान नंदेश्वर निवृत्त झाले. कुमार यांनी बँकेचे ऑडिट केले असता हा घोटाळा उघडकीस आला. त्यांनी गणेशपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon