माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी शेवाळे यांच्याकडून साड्यांचे वाटप; नागरिकांचा संताप, महागड्या साड्याच पेटवल्या
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींमुळे सत्ताधाऱ्यांना होत असलेला फायदा लक्षात घेऊन महिला मतदारांच्या मतांवर शिंदेसेनेचा डोळा आहे. महिलांना आकृष्ट करण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवल्या जात आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना पक्षाचे माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी शेवाळे यांच्याकडून साड्यांचे वाटप करण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला.
मुंबईतील महायुतीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आल्याचे चित्र आहे. पुढील दोन दिवसांत मुंबईच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब होणार आहे.लवकरच शिवसेना भाजपमध्ये चर्चेची तिसरी फेरी होणार आहे. काही उमेदवारांच्या नावांवर पक्षाकडून शिक्कामोर्तबही करण्यात आले आहे. पक्ष नेतृत्वाकडून त्यांना कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रभाग क्रमांक १४२ मध्ये कामिनी शेवाळे यांची उमेदवारी फिक्स आहे. मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत.
मुंबई महानगर पालिकेसाठी ठाकरे बंधू एकत्र आल्याने मतांची गणिते बदलून गेली आहेत. त्यामुळे प्रचारापासून राजकीय डावपेच आखण्यातपर्यंत आघाडी घेण्याचे प्रयत्न शिंदेसेनेच्या कामिनी शेवाळे यांचे सुरू आहेत. कामिनी शिंदे यांनी वॉर्डमध्ये मतदारांना साडी वाटप केल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. मात्र स्थानिकांनी ही गोष्ट खटकल्याने प्रभाग क्रमांक १४२ मध्ये वाटलेल्या साड्या महिलांनी पेटवून दिल्या.
निवडणुका जाहीर झाल्यानंतर देखील साड्या वाटप केल्या जात आहेत, असा आक्षेप ठाकरेंच्या सेनेने निवडणूक आयोगाकडे नोंदवला. चेंबूरमध्ये राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी शेवाळे या जिंकण्यासाठी केविलवाणी धडपड करत असल्याची टीका ठाकरे शिवसेनेने केली. शेवाळे यांचे मनसुबे पूर्ण होऊ देणार नाही, चेंबूरमध्ये मशाल पेटणारच, असा विश्वास ठाकरेंच्या शिवसेनेने बोलून दाखवला.