मुंबईत बनावट सोन्याची मोठी फसवणूक; आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, पाच जण अटकेत

Spread the love

मुंबईत बनावट सोन्याची मोठी फसवणूक; आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, पाच जण अटकेत

मुंबई : ‘उत्खननात सापडलेले जुने सोन्याचे दागिने’ असल्याचे भासवून एका व्यापाऱ्याला तब्बल २५ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मालाड (पश्चिम) पोलिसांनी केलेल्या या कारवाईत राजस्थानातील जालोर जिल्ह्यातील पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून १५.४५ लाख रुपये रोख आणि एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे.

मालाड परिसरात राहणारे व्यापारी दिनेश मेहता (वय ५१) यांना बाबुलाल भलाराम वाघेला (वय ५५) याने राजस्थानी भाषेत संवाद साधत विश्वासात घेतले. नाशिकजवळील एका मंदिर परिसरात उत्खनन करताना जुने सोन्याचे दागिने सापडल्याचा बनाव करत, ते दागिने स्वस्त दरात विकण्याचे आमिष त्याने दाखवले. व्यवहारानंतर हे दागिने तपासले असता ते पूर्णपणे बनावट व पितळाचे असल्याचे उघड झाले.

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मेहता यांनी मालाड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तब्बल १०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून आरोपींचा माग काढला. अखेर गुजरात आणि पालघर जिल्ह्यातील विरार परिसरातून पाच आरोपींना अटक करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये बाबुलाल भलाराम वाघेला, कोकुबाई बाबुलाल वाघेला (वय ५०), मंगलाराम मनाराम वाघारी (वय ३४), केसराम भगताराम वाघारी आणि भवरलाल बाबुलाल वाघारी यांचा समावेश आहे. मुख्य आरोपी बाबुलाल हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणी आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१६(२) (विश्वासघातकी फसवणूक), ३१८(४) (फसवणूक) आणि ३(५) (सामान्य हेतूने गुन्हा) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत काळे आणि दीपक रायवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटना वाढत असल्याने ‘स्वस्त सोन्याच्या’ आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन मुंबई पोलिसांनी नागरिकांना केले आहे. संशयास्पद व्यवहार किंवा व्यक्ती आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon