नैना भूखंड मोजणीसाठी ६ लाखांची लाच; भूमी अभिलेख कार्यालयातील नीमतारदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात, उपअधीक्षक ताब्यात

Spread the love

नैना भूखंड मोजणीसाठी ६ लाखांची लाच; भूमी अभिलेख कार्यालयातील नीमतारदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात, उपअधीक्षक ताब्यात

पोलीस महानगर नेटवर्क

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रभाव क्षेत्र (नैना) अंतर्गत भूखंड मोजणीच्या शासकीय कामासाठी तब्बल ६ लाख रुपयांची लाच स्वीकारताना भूमी अभिलेख कार्यालयातील नीमतारदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. या प्रकरणात उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यालाही ताब्यात घेण्यात आले असून, या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. नवी मुंबई घटकाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही यशस्वी सापळा कारवाई केली.

समोर आलेल्या माहितीनुसार, कामोठे येथील २७ वर्षीय युवक एका विकासकाकडे कार्यरत असून, टीपीएस-१ मधील भूखंड क्रमांक २७ याची मोजणी करून अधिकृत पत्र मिळवण्यासाठी त्याला अधिकारपत्र देण्यात आले होते. त्यानुसार त्याने उपअधीक्षक भूमी अभिलेख (नैना) कार्यालयात अर्ज दाखल केला होता. दिनांक ५ डिसेंबर २०२५ रोजी मोजणी झाल्यानंतर पत्र देण्यासाठी नीमतारदार कलीमउद्दीन रियाजुद्दीन शेख याने तक्रारदाराशी संपर्क साधत उपअधीक्षक दिलीप तुळशीराम बागुले यांची भेट घडवून दिली.

या भेटीत उपअधीक्षक बागुले यांनी सुरुवातीला २ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. पुढे दोघांनी मिळून एकूण ९ लाख रुपयांची मागणी केल्याचे पडताळणी कारवाईत निष्पन्न झाले. चर्चेनंतर ही रक्कम ६ लाख रुपयांवर निश्चित करण्यात आली. या प्रकाराला कंटाळून तक्रारदाराने १५ डिसेंबर २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली.

त्यानुसार १६ डिसेंबर रोजी सीबीडी बेलापूर रेल्वे स्टेशनच्या पार्किंगमध्ये सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून ६ लाख रुपये स्वीकारताना नीमतारदार शेख यास रंगेहात पकडण्यात आले, तर उपअधीक्षक बागुले यांनाही ताब्यात घेण्यात आले. कारवाईदरम्यान दोघांची अंगझडती घेण्यात आली असता, बागुले यांच्याकडे ७५० रुपये रोख, तर शेख यांच्याकडे २०,०५० रुपये रोख व सेलेरियो कारची चावी आढळून आली. दोघांचे मोबाईल फोन तपासणीसाठी जप्त करण्यात आले आहेत.

दरम्यान, आरोपी दिलीप बागुले (बदलापूर) व कलीमउद्दीन शेख (कामोठे) यांच्या राहत्या घरांची झडती उशिरापर्यंत सुरू होती. या प्रकरणी सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत कलम ७ व १२ नुसार गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक धर्मराज सोनके यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुंधती येळवे करत आहेत. या घटनेमुळे नैना प्रकल्पाशी संबंधित शासकीय कामांतील भ्रष्टाचार पुन्हा एकदा उघडकीस आला असून, महसूल विभागातील गैरप्रकारांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon