भाजपच्या नेतृत्वात मोठा बदल; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती
पोलीस महानगर नेटवर्क
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने (भाजप) नेतृत्वात महत्त्वाचा बदल करत बिहार सरकारचे मंत्री नितीन नबीन यांची पक्षाच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा कार्यकाळ संपल्यानंतर नितीन नबीन यांच्याकडे पक्षाच्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. याबाबतची अधिकृत अधिसूचना भाजपकडून जारी करण्यात आली आहे.
नितीन नबीन हे सध्या बिहार सरकारमध्ये मंत्री म्हणून कार्यरत आहेत. अलीकडेच बिहारमध्ये भाजपला मिळालेल्या ऐतिहासिक यशाच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. बिहारसह राष्ट्रीय राजकारणात या निर्णयाकडे भाजपची दीर्घकालीन रणनीती म्हणून पाहिले जात आहे.
भाजपच्या विद्यार्थी मोर्चापासून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या नितीन नबीन यांनी पक्ष संघटनेत विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. कडक शिस्तीचा आणि संघटनात्मक बांधणीवर भर देणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्या निर्णयक्षमतेचे पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून वारंवार कौतुक झाले आहे. बिहार भाजपच्या संघटनात्मक मजबुतीतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
राष्ट्रीय स्तरावर प्रथमच इतकी मोठी जबाबदारी नितीन नबीन यांच्याकडे सोपवण्यात आल्याने भाजपच्या आगामी राजकीय वाटचालीत त्यांच्या भूमिकेकडे विशेष लक्ष लागून राहिले आहे.