उबेर बाईक चालकाकडून तरुणीचा विनयभंग व जबरी चोरी; आरोपी अटकेत
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण : उबेर अँपद्वारे बुक केलेल्या मोटारसायकलवरून प्रवास करत असताना २६ वर्षीय तरुणीचा विनयभंग करून तिच्याकडील रोख रक्कम जबरीने लुटल्याची धक्कादायक घटना १३ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी कल्याणमध्ये घडली. या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी उबेर चालकाला अटक करण्यात आली आहे.
फिर्यादी तरुणी ही सिटी फिटनेस सेंटर (सितारा हॉटेल शेजारी, कल्याण स्टेशनजवळ) येथे जाण्यासाठी उबेर अँपवरून बाईक बुक केली होती. एक्सेस १२५ स्कूटर (क्रमांक MH04/MM/3365) वरील चालक सिद्धेश संदीप परदेशी (वय १९, रा. खडकपाडा, कल्याण) याने बुकिंग स्वीकारून तरुणीला संपदा हॉस्पिटल परिसरातून गाडीवर बसवले. मात्र निश्चित स्थळी न नेता त्याने सिंडिकेट पोलीस वसाहतीकडील अंधाऱ्या रस्त्याने मोकळ्या जागेत नेण्याचा प्रयत्न केला.
संशय आल्याने तरुणीने गाडीवरून उडी मारताच आरोपीने तिचा हात पकडून तिच्या लज्जेला धक्का देत विनयभंग केला. तसेच तोंडात माती कोंबून चाकूचा धाक दाखवत तिच्या पर्समधील १ हजार रुपये जबरीने काढून घेतल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक १२३२/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (६), ७४, ३२४ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस अटक करण्यात आली असून मा. न्यायालयाने त्यास १८ डिसेंबर २०२५ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. पुढील तपास महात्मा फुले चौक पोलीस करीत आहेत.