श्वान पथकातील ‘कायरा’ सेवानिवृत्त; दशकभर गुन्हे उकलण्यात महत्त्वाची साथ
पोलीस महानगर नेटवर्क
सोलापूर : सोलापूर शहर पोलिसांच्या गुन्हे शोध शाखेतील अत्यंत कुशल आणि तितकाच विश्वासू असलेल्या ‘कायरा’ या श्वानाने दहा वर्षांची उत्तम सेवा पूर्ण करून अखेर सेवानिवृत्ती स्वीकारली. गुन्हे उकलण्यात पोलिसांना मोठी मदत करणाऱ्या कायराला ९ डिसेंबर २०२५ रोजी सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला.
कायराने आपल्या सेवाकाळात अनेक गुन्ह्यांची उकल करण्यात महत्वाची भूमिका बजावली. २०१९ मध्ये विजापूर रोडवरील गजानन महाराज मंदिरातील चोरीप्रकरणी कायराने ठोस सुगावा मिळवून पोलिसांना गुन्हा उघडकीस आणण्यास मदत केली होती. घटनास्थळी आढळलेल्या तुटलेल्या कुलुपाचा वास घेऊन कायराने सुमारे पाचशे मीटर अंतरावर असलेल्या मोकळ्या जागेकडे धाव घेतली. त्या ठिकाणच्या तपासात आरोपींशी संबंधित वस्तू सापडून चोरीचा गुन्हा उकलला गेला. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तत्कालीन पोलीस उप-आयुक्त गुन्हे बापू बांगर यांनी कायरासह हँडलर पोह. श्रीकांत दोरनाल व पोह. संतोष गवंडी यांना बक्षीस देऊन गौरविले होते.
तसेच २०२२ मध्ये एम.आय.डी.सी. परिसरातील खुनाच्या गंभीर प्रकरणातील तपासातही कायराने मोलाची साथ दिली. घटनास्थळी सापडलेल्या चप्पलचा वास घेऊन कायराने संशयित आरोपीची ओळख परेडदरम्यान अचूक ओळख पटवली आणि पोलिसांच्या तपासाला दिशा मिळाली. मालाविषयक आणि शारीरिक गुन्ह्यांच्या तपासात कायराने यापूर्वीही अनेकदा यश मिळवून दिले आहे.
कायराच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमास पोलीस आयुक्त एम. राजकुमार, उप-आयुक्त गौहर हसन, विजय कबाडे, डॉ. अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने तसेच श्वान पथकातील सर्व अधिकारी आणि अंमलदार उपस्थित होते. कायराच्या कार्यक्षमतेची आणि निष्ठेची उपस्थित मान्यवरांनी प्रशंसा केली.
दहा वर्षांच्या अविरत सेवेनंतर ‘कायरा’चा हा निरोप सोहळा भावूक करणारा ठरला. पोलिसांचे कार्य अधिक परिणामकारक करण्यासाठी श्वान पथकातील अशा दक्ष आणि प्रशिक्षित श्वानांची भूमिका किती महत्त्वाची असते, याची पुन्हा एकदा जाणीव या कार्यक्रमातून झाली.