रिक्षा चालकाच्या प्रामाणिकपणामुळे हरवलेले १५ तोळे सोने मालकाला परत; अंबरनाथ पोलिसांची तत्परता
पोलीस महानगर नेटवर्क
अंबरनाथ : रिक्षा चालकाच्या प्रामाणिक भूमिकेमुळे आणि अंबरनाथ पोलीस स्टेशनच्या तत्पर कार्यवाहीमुळे हरवलेले १५ तोळे सोने (अंदाजे २२ लाख रुपये) मूळ मालकाला सुखरूप परत मिळाल्याची प्रेरणादायी घटना अंबरनाथ येथे घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रवासादरम्यान संबंधित प्रवाशाचे मौल्यवान सोन्याचे दागिने रिक्षामध्ये विसरून राहिले होते. ही बाब लक्षात येताच रिक्षा चालकाने कोणताही गैरफायदा न घेता तात्काळ अंबरनाथ पोलीस स्टेशनशी संपर्क साधत संपूर्ण माहिती दिली. पोलिसांनी त्वरित कार्यवाही करून दागिन्यांची खातरजमा केली आणि योग्य तपासानंतर ते मूळ मालकाच्या स्वाधीन केले.
या प्रामाणिकपणाबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या हस्ते संबंधित रिक्षा चालकाचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. चालकाच्या या आदर्श कृतीमुळे समाजात प्रामाणिकपणा व माणुसकीचे दर्शन घडल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
या घटनेमुळे पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला असून, अंबरनाथ पोलिसांच्या तत्परतेचेही सर्वत्र कौतुक होत आहे.