मुंबई रेल्वे पोलिसांची ‘मोबाईल शोध’ मोहीम यशस्वी; १,०१८ मोबाईल प्रवाशांना परत, १.८० कोटींचा मुद्देमाल हस्तांतरित

Spread the love

मुंबई रेल्वे पोलिसांची ‘मोबाईल शोध’ मोहीम यशस्वी; १,०१८ मोबाईल प्रवाशांना परत, १.८० कोटींचा मुद्देमाल हस्तांतरित

सुधाकर नाडार/ मुंबई

मुंबई : मुंबई रेल्वे पोलिसांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी राबविलेल्या विशेष मोहिमेत चोरीस गेलेले तब्बल १,०१८ मोबाईल फोन शोधून काढून ते मूळ मालकांना परत केले आहेत. या मोबाईलची एकूण किंमत १ कोटी ८० लाख ३३ हजार ६६८ रुपये इतकी असून, ही कारवाई रेल्वे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे ठळक उदाहरण मानली जात आहे.

१८ मे २०२५ रोजी पदभार स्वीकारल्यानंतर पोलिस आयुक्त एम. कलासागर यांनी रेल्वे पोलीस आयुक्तालयातील गुन्हेगारी स्थितीचा सखोल आढावा घेतला. मोबाईल चोरीचे वाढते प्रमाण लक्षात येताच त्यांनी या गुन्ह्यांवर लक्ष केंद्रीत करत विशेष शोधमोहीम राबविण्याचे आदेश दिले. त्यानुसार जून ते जुलै २०२५ या कालावधीत पहिल्या टप्प्यात ६८४ मोबाईल हस्तगत करण्यात आले. या मोबाईलची किंमत १ कोटी ११ लाख ३९ हजार ६२६ रुपये असून, २५ जुलै रोजी ते फिर्यादींना परत करण्यात आले.

पहिल्या मोहिमेच्या यशानंतर सप्टेंबर ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत दुसरी विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेसाठी मध्य परिमंडळाची २८ आणि पश्चिम परिमंडळाची २९ अशी एकूण ५७ पथके तैनात करण्यात आली. या पथकांनी देशभरातील १७ राज्ये व केंद्रशासित प्रदेश तसेच दमणपर्यंत जाऊन चोरीस गेलेले मोबाईल शोधून काढले. या टप्प्यात मुंबई शहरातून ४४४, महाराष्ट्रातून २१६ आणि इतर राज्यांतून ३५८ मोबाईल हस्तगत करण्यात आले.

या दोन्ही मोहिमांच्या एकत्रित कामगिरीतून एकूण १,०१८ मोबाईल शोधून काढण्यात यश मिळाले. १० डिसेंबर २०२५ रोजी घाटकोपर येथील नवरंग सभागृहात भव्य कार्यक्रमात हा मुद्देमाल संबंधित प्रवाशांना सन्मानपूर्वक सुपूर्द करण्यात आला. या कार्यक्रमासंदर्भात पोलिस उपआयुक्त प्रज्ञा जेडगे, पोलिस उपआयुक्त सुनिता सांळुखे-ठाकरे, सर्व सहाय्यक पोलिस आयुक्त, वरिष्ठ पोलिस निरीक्षक तसेच सायबर सेलचे पोलिस निरीक्षक मंगेश खाडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

मुंबई रेल्वे पोलिसांची ही कामगिरी प्रवाशांचा विश्वास वाढवणारी ठरली असून, अन्य पोलीस दलांसाठीही ही मोहीम प्रेरणादायी ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon