तळोजा एमआयडीसीत स्टील रॉड चोरीचा आरोप; पोलिस संरक्षणाच्या चर्चेने खळबळ

नवी मुंबई : तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही महिन्यांपासून रात्री ते पहाटेच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर स्टील रॉड्सची चोरी होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या कथित प्रकारात काही टोळ्या सक्रिय असून, ड्रायव्हरांच्या संगनमताने ट्रकमधून थेट माल चोरला जात असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार, तळोजा एमआयडीसी रोडवरील हिंडाल्को कंपनी आणि हिंदुस्थान ढाबा परिसरात ही चोरी बिनधास्तपणे सुरू असून, यातून रोज लाखो रुपयांचा माल गायब होत असल्याचा दावा करण्यात येत आहे. या सर्व प्रकारामागे काही समाजकंटकांची नावे चर्चेत असून, या अवैध धंद्याला कथितपणे पोलिसांकडूनच संरक्षण दिले जात असल्याचा आरोपही व्यक्त केला जात आहे. मात्र या आरोपांना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
सध्या विधिमंडळ अधिवेशन सुरू असल्यामुळे हा कथित अवैध व्यवसाय तात्पुरता थांबवण्यात आल्याची चर्चा असून, अधिवेशन संपल्यानंतर पुन्हा तो सुरू होण्याची भीती उद्योगवर्तुळातून व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात जे कोणी पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी दोषी असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी नागरिक व उद्योजकांकडून होत आहे.
या घटनेमुळे तळोजा एमआयडीसीतील उद्योजकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, अशा प्रकारांमुळे औद्योगिक परिसरातील सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन स्वतंत्र चौकशीचे आदेश द्यावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस प्रशासन या गंभीर आरोपांवर काय भूमिका घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.