माथाडी कामाच्या वादातून अंधेरीत तुफान हाणामारी; तिघे गंभीर जखमी, १५ ते १७ जणांवर गुन्हा दाखल

Spread the love

माथाडी कामाच्या वादातून अंधेरीत तुफान हाणामारी; तिघे गंभीर जखमी, १५ ते १७ जणांवर गुन्हा दाखल

पोलीस महानगर नेटवर्क

मुंबई : अंधेरी पूर्वेतील पुनमनगर सहकार भंडार परिसरात माथाडीचे काम मिळवण्याच्या वादातून दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना ५ डिसेंबर रोजी घडली. या घटनेत बाबू सुतार यांच्या गटातील सुनिल बालगीर, दानिश सय्यद व अक्षय हे तिघे गंभीर जखमी झाले असून या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात १५ ते १७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराला जयसिंग माळी यांनी सकाळी साईटवर बोलावले होते. त्यानुसार तो सुनिल बालगीर यांच्यासह महिंद्रा मराजो कारने पुनमनगर येथील बाबू सुतार यांच्या साईटवर पोहोचला. यावेळी दत्ता परब व जयसिंग माळी यांच्यात ‘या साईटवरील माल कोण उतरवणार’ यावरून वाद सुरू झाला. काही वेळातच दत्ता परबने फोन केल्यानंतर ४ ते ५ वाहनांमधून रोहित मस्के, मोहन मोहिते, बडा कन्ना, छोटा कन्ना, कुमार, सत्या व त्यांचे साथीदार असे १५ ते १७ जण घटनास्थळी दाखल झाले.

यानंतर दत्ता परबने जयसिंग माळी यांची कॉलर पकडून धमकावले. मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या तक्रारदार, सुनिल आणि अक्षय यांना आरोपींनी हाताने व शिवीगाळ करत मारहाण केली. दत्ता परबने लाकडी बांबूने तक्रारदार व सुनिल यांच्यावर हल्ला केला. दानिश सय्यद यांनाही बांबू व हाताने मारहाण करण्यात आली.

हल्ल्यानंतर बडा कन्ना याने दानिश सय्यद यांना “उपचारासाठी नेतो” असे सांगून जबरदस्तीने पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा क्रिस्टा कारमध्ये बसवले. मात्र जोगेश्वरी पूर्व येथील मॉरिस गॅरेजजवळ त्यांना खाली उतरवून आरोपी तेथून पळून गेले. या झटापटीत दानिश यांच्या गळ्यातील अंदाजे १५ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन तुटून गहाळ झाली असून तिची किंमत सुमारे एक लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.

जखमी तिघांनी कूपर रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या जयसिंग माळी यांनीही या घटनेची पुष्टी केली आहे. पोलिसांनी दत्ता परब, रोहित मस्के, मोहन मोहिते, बडा कन्ना, छोटा कन्ना, कुमार व सत्या यांच्यासह १५ ते १७ जणांविरोधात मारहाण, शिवीगाळ, धमकी, अपहरणाचा प्रयत्न व सोन्याची चेन गहाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon