दोन कोटींची लाच मागणारा पीएसआय प्रमोद चिंतामणी अखेर बडतर्फ; ४६ लाखांची लाच स्वीकारताना सापडला रंगेहाथ
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे : दोन कोटी रुपयांची लाच मागितल्याच्या गंभीर प्रकरणात अडकलेला पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी याला अखेर शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त विनायकुमार चौबे यांनी याबाबतचे आदेश जारी केले असून, चिंतामणी यांच्या अनेक गैरकृत्यांचा तपशील समोर आल्यानंतर ही कठोर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, चिंतामणी याने पिंपरी-चिंचवड परिसरातील ४० हून अधिक नागरिकांना “पैसा दुप्पट करून देतो” असे आमिष दाखवून फसवणूक केली होती. या माध्यमातून त्याने सुमारे पाच कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल असून, फसवणुकीतून मिळालेले पैसे त्याने स्वतःच्या मेहुण्याच्या बँक खात्यावर जमा करून घेतल्याचेही तपासात उघड झाले आहे.
२ नोव्हेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून दोन कोटींची लाच मागणाऱ्या चिंतामणीला ४६ लाख ५० हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले होते. या कारवाईनंतर त्याच्या निवासस्थानी झडती घेण्यात आली असता आणखी ५१ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. लाच प्रकरणाच्या वेळी चिंतामणी आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत होता.
दरम्यान, पुण्यातील आणखी एका मोठ्या लाचप्रकरणात सहकारी संस्थेच्या सभासदांकडून तब्बल आठ कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लिक्विडेटर आणि ऑडिटरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. या कारवाईत सहकार विभागातील लिक्विडेटर विनोद देशमुख आणि ऑडिटर भास्कर पोळ यांना ताब्यात घेण्यात आले.
धनकवडी परिसरातील एकता सहकारी संस्था २००५ साली स्थापन झाली असून तिचे एकूण ३२ सभासद आहेत. संस्थेच्या मालकीची एक महत्त्वाची जागा पुण्यात आहे. मात्र २०२० साली सभासदांमध्ये वाद निर्माण झाल्यानंतर हे प्रकरण सहकार विभागाकडे गेले. त्यानंतर २०२४ मध्ये विनोद देशमुख यांची संस्थेवर लिक्विडेटर म्हणून नियुक्ती करण्यात आली. लिक्विडेटर पदावर कार्यरत असताना देशमुख यांनी सभासदांना शेअर सर्टिफिकेट मिळवण्यासाठी तीन कोटी रुपये आणि संस्थेची जागा विक्रीची परवानगी मिळवण्यासाठी अतिरिक्त पाच कोटी रुपयांची लाच मागितल्याचे समोर आले आहे. या आठ कोटींच्या मागणीतील पहिला हप्ता म्हणून तीस लाख रुपये स्वीकारताना शनिवार पेठेतील एका कार्यालयासमोर एसीबीने देशमुख आणि पोळ या दोघांना रंगेहाथ अटक केली.
या दोन्ही प्रकरणांमुळे पुणे पोलिस दल आणि प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, लाचखोरीविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.